गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची घेतली भेट.
प्रतिनिधी:समर्थ भारत
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयातील गृहमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन (प्रोबेशन) अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलीसांची चांगली प्रतिमा आणि पोलीस यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबरच वर्दीच्या सर्वोच्चतेचा सन्मान करा असे मार्गदर्शन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना केले.
पोलीसांकडून जनतेला चांगल्या वर्तनाची तसेच न्याय मिळण्याची अपेक्षा असते. अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयातच नव्हे तर समाजात वावरतानादेखील आपले कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांप्रती जागरूक राहिले पाहिजे, असे गृहमंत्री म्हणाले. कोरोना काळात पोलीसांनी गरीब व गरजूंना मोठया प्रमाणावर केलेल्या मदतीमुळे पोलीसांबद्दल जनमानसामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास टिकविण्याबरोबरच जनतेशी संपर्क आणि संवाद वाढविण्यावर भर देण्यात यावा, असेही ते म्हणाले. कर्तव्य बजावताना पोलीस ठाण्यात आलेल्या प्रत्येक घटकाच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यांना योग्य तो न्याय मिळेल यासाठी प्रयत्नरत रहावे. पोलीसांनी जनतेचा मित्र म्हणून काम करावे. पीडित, अन्याय-अत्याचारग्रस्त नागरिकांना दिलासा दयावा असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी तसेच अपराधसिद्धतेचा दर उंचविण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरावर विशेष भर देण्यात येत असून पोलीस दलाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली.