पुणे - प्रतिनिधी
आरोग्य भरती, शिक्षक पात्रता परिक्षा, म्हाडामधील भरतीमधील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर आता सैन्यातील भरतीमध्ये देखील गैरप्रकार होत असल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. सैन्यात मेजर असल्याचे भासवीत नाशिक येथील लष्कराच्या आर्टिलरी सेंटर येथे सुरू असलेल्या भरती मेळाव्याद्वारे सैन्यात भरती करून देण्याच्या बहाण्याने उमेदवारांची फसवणूक करणाऱ्याचा बनावट लष्करी अधिकाऱ्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाच्या पुणे युनिटने ही कारावार्इ केली. गणेश बाळू पवार (रा. हर्सूल गाव, चांदवा तहसिल, जिल्हा नाशिक) असे या तोतयाचे नाव आहे. त्याला अटक करून नाशिक पोलिसांच्या हवाले करण्यात आले आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पवार याला देवळाली कॅन्टोन्मेंट येथून पकडण्यात आले.लष्करी गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हा मंगळवारी (ता. २८) लष्कराची मेजर ही रँक असलेला लढाऊ गणवेश (कॉम्बॅट युनिफॉर्म) घालून देवळाली कॅन्ट परिसरात फिरत असत. परिसरात फिरण्यासाठी तो एमएच १५ जीएक्स ४८८८ क्रमांकाची मारुती अर्टिगा गाडीचा वापरत. भरती मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे त्याने गोळा केली होती. संबंधित उमेदवारांना लष्करात भरती होण्यासाठी मदत करण्याचे आमिष त्याने दाखवले. पवार याने किती उमेदवारांना भरती करून देण्याचे आमिष दाखवले, त्यासाठी त्याला कोणी मदत केली, त्याने काही बनावट कागदपत्रे तयार केली आहेत का? पवार याने उमेदवारांकडून किती पैसे घेतले व लष्करातील कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्याने त्याला या गुन्ह्यात मदत केली का? याचा पोलिस तपास करीत आहेत.चालकाकडूनही घेतले तीन लाख :पवार याने त्याचा चालक नीलेश छबू खैरे याला देखील सशस्त्र दलात नागरी संरक्षण कर्मचारी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी त्याने त्याच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते. अधिक चौकशी केली असता, पवार याने काही व्यक्तींकडून १५ लाख रुपये घेतल्याचेही पुढे आहे.सर्व्हिंग सर्टिफिकेटचा वापर करून घेतले ३९ लाखांचे कर्ज :पवार याने लष्करी गणवेशातील फोटो, चारित्र्य प्रमाणपत्र आणि देवळाली येथील स्टेशन हेडक्वार्टरचा बनावट शिक्का वापरून तयार केलेल्या सर्व्हिंग सर्टिफिकेटचा वापर कर्ज घेण्यासाठी केला आहे. सैन्यात कामाला असलेल्याचे बनावट कागदपत्र तयार करून पवार याने गावातील घराच्या बांधकामासाठी युनियन बँक ऑफ इंडियाच्या चांदवड शाखेतून ३९ लाखांचे कर्ज घेतले असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे.