पुणे : प्रतिनिधी
मुद्रा योजनेतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची पावणे तीन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी कात्रज येथील ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी महिलेचा खासगी ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. व्यावसायासाठी या महिलेला कर्जाची गरज होती. त्यासाठी तिने एका संकेतस्थळावरुन माहिती घेतली. दरम्यान, एका अनोळखी व्यक्तीने या महिलेशी मोबाईलद्वारे संपर्क साधला. त्याने तिला ‘प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजने’तून कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी प्रक्रिया शुल्क म्हणून २ लाख ८० हजार ६७५ रुपये ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. फिर्यादीने पैसे पाठविल्यानंतर संबंधित व्यक्तीशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. पोलिस निरीक्षक संगीता यादव तपास करीत आहे.