पुणे प्रतिनिधी:
भावाच्या लग्नाला जाण्यास विरोध केला असताना देखील लग्नाला आलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी करणाऱ्या पतीवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आव्हाळवाडीमध्ये घडला. या प्रकरणी नारायण बाजीराव चव्हाण (वय ३५, रा. मोमीन आखाडा, राहुरी, जि. अहमदनगर) यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अनिल दादाराव जाधव (वय ३०, रा. आव्हाळवाडी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा अनिल जाधव यांचा नारायण चव्हाण हा मेव्हणा आहे. जाधव यांचे लग्न असल्याने चव्हाण याच्या पत्नीला भावाच्या लग्नाला जायचे होते. परंतु, चव्हाण याने पत्नीला लग्नाला जाण्यास विरोध केला. मात्र, तरीही फिर्यादी यांची बहीण लोणीकंद येथे लग्नाला आली. याच कारणावरून चव्हाण याने चाकूने पत्नीच्या गळ्यावर वार करून गंभीर जखमी केले आहे.