लोणावळा प्रतिनिधी:
लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा व विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रशांत शांताराम आंबेकर (रा. देवले, मावळ), अनिकेत अशोक कालेकर (रा. काले, पवनानगर, मावळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी माहिती दिली. मळवली व देवले परिसरात एक तरुण विनापरवाना पिस्तूल बाळगत संशयास्पद फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार पोलिसांनी मळवली देवले रस्त्यावर सापळा रचून प्रशांत आंबेकर याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळाले. पिस्तूलाबाबत विचारले असता त्याने अनिकेत कालेकर याने हे पिस्तूल दिले असल्याची माहिती दिली. दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने शनिवारपर्यंत (ता. १) पोलिस कोठडी सुनावली आहे.