घोडेगाव : प्रतिनिधी
मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री क्षेत्र भिमाशंकर व येथील अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांमुळे कोणतेही गालबोट लागू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर व १ जानेवारीला नाकाबंदी करून कायदा मोडणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी आदेश लागू आहे. श्री क्षेत्र भिमाशंकर येथे पर्यटनाच्या नावाखाली होणाऱ्या दारू पार्ट्या व इतर अवैध धंदे रोखण्यासाठी जुन्नर फाटा, डिंभा, तळेघर, म्हातरबाची वाडी याठिकाणी चेक नाके उभारण्यात आले आहेत. पोलिस व्हॅनद्वारे पेट्रोलिंग सुरू आहे. पर्यटन स्थळावर डीजे लावून धांगडधिंगा करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. ‘‘वन कर्मचाऱ्यांमार्फत जंगलातून पेट्रोलिंग केले जाणार आहे. म्हातारबाची वाडी याठिकाणी असलेल्या वनविभागाच्या चेक नाक्यावर कडक तपासणी करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती भिमाशंकर वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी दिली.