बेल्हे : प्रतिनिधी
कल्याण - नगर राष्ट्रीय महामार्गावर ‘माळशेज घाट पायथा ते घाटमाथा’ दरम्यान बोगदा तयार करण्यात यावा, अशी मागणी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जुन्नर तालुक्यातील नागरिकांना माळशेज घाटमार्गे मुंबईला जाण्यासाठी हा जवळचा महामार्ग आहे. या महामार्गावर नेहमी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. पावसाळ्याच्या दिवसात माळशेज घाटात दरडी कोसळण्याचा धोका असतो. या घाटात अनेकदा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत. माळशेज घाट रस्त्यासाठी ‘घाटपायथा ते घाटमाथा’ असा बोगदा तयार केल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होऊ शकेल. प्रवासी वर्गाचा प्रवास सुरक्षित होऊ शकेल, असेही पांडुरंग पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनाही पाठवले आहे.