मुंबई: प्रतिनिधी
विरोधकांना सातत्यानं अंगावर घेणारे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी सध्या लगीनघाई सुरू आहे. संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न होणार आहे. हा विवाह सोहळा उद्या म्हणजेच 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
दरम्यान, मुलीच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित संगीत कार्यक्रमात आज संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत ठेका धरला. या दोघांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या डान्स चर्चेत आला. यातच आता या लग्नाची आमंत्रण पत्रिका जोरदार चर्चेत आली आहे. कारण, ही पत्रिका 'पीएम'च्या लग्नाचे आमंत्रण देत आहे.
उद्याच्या लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी छापण्यात आलेली ही लग्नपत्रिकाच सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कारण या पत्रिकेच्या मुखपृष्ठावरील (पीएम की शादी) असा हॅशटॅग टाकण्यात आला आहे.
#PMkiShaadi हॅशटॅग चर्चेत
या लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे नाव इंग्रजीत आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन एक खास हॅशटॅग तयार करण्यात आलाय. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असे छापण्यात आले आले. हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच, लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.