आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सूचना
समर्थ भारत न्यूज
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील जलसिंचन प्रकल्पांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक झाली. प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री श्री पाटील यांनी यावेळी दिले.
जलसंपदा विभागाच्या आंबेगाव शिरुर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लोणी आणि धामणी परिसरास पाणी देण्यासाठी नियोजित म्हाळसाकांत उपसा सिंचन योजना राबविण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले. तसेच आदिवासी भागातील कळमजाई उपसा सिंचन योजनेचे सर्व्हेक्षण तातडीने पूर्ण करुन घ्यावे असे ही सांगितले.सर्व प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलसंपदा विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. त्याअनुषंगाने पुण्यात पुन्हा एकदा व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी. त्यास संबंधित लोकप्रतिनिधी यांना बोलवण्यात यावे, अशा सूचना श्री. पाटील यांनी दिल्या.
यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, शिरूर तालुक्यातील पाबळ आणि परिसरातील १२ गावांच्या परिसराची पाणी गरज पूर्ण करण्यासाठी योजना तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.तसेच पाबळ, केंदूर आणि करंदी गावातील प्रस्तावित पाणी पुरवठा योजनेसाठी पाणी आरक्षण करणे आणि साठवण तलावासाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता स्पष्ट केली. तसेच पाणी आरक्षित करण्याबाबत व जलसंपदा विभागाची जागा साठवण बंधाऱ्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे सांगितले.
बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) बसवंत स्वामी, कार्यकारी संचालक विलास रजपूत, मुख्य अभियंता हणमंत गुणाले, मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता प्रविण कोल्हे, डिंभे धरण प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता सं. ज. माने, कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता सं.गा. सांगळे उपस्थित होते.