अश्पाक मुल्ला अक्कलकोट प्रतिनिधी:
एसटी आणि फॉर्च्युनर गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चार जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना कर्नाटक राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील बसवकल्याण जवळ घडली आहे या भीषण अपघातात चिदानंद सुरवसे यांचा ड्रायव्हर काळे याचाही जागीच मृत्यू झाला आहे. मृत चिदानंद सुरवसे (वय ४७) यांची फॉर्च्युनर गाडी (MH13CS3330) ही कर्नाटक राज्यातील एसटी क्रमांक KA22F2198बसला धडकली आणि पलटी झाली. त्यामुळे या गाडीचा चक्काचूर झाल्याचं दिसत आहे. या अपघातानंतर चौघेही जागीच ठार झाले. सुरवसे यांच्यासोबत पवार, वाहन चालक काळे आणि आणखी एक जण होता.
त्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, चारही मृतदेह विजयपूरमधील शासकीय हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे तातडीने घटनास्थळी निघाले. त्यांच्यासोबत सुरवसे यांचे कुटुंबीयसुद्धा विजयपूरकडे रवाना झाले आहेत. चिदानंद सुरवसे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते असून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक होते. नांदणीचे ते अनेक वर्षे सरपंच होते.