मुंबई : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बऱ्याच चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियात सक्रीय असतात. वेगवेगळ्या राजकीय मुद्द्यावर अमृता या रोखठोक भाष्य करत असतात. अमृता फडणवीसांनी शिवसेनेसोबत ट्विटरवरुन घेतलेला पंगा चांगलाच चर्चेत आला होता. अमृता फडणवीस या सातत्याने राजकीय विषयावर भाष्य करत असतात त्यामुळे त्या भविष्यात राजकारणात प्रवेश करतील का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. परंतु आता खुद्द त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर दिले आहे.
अलीकडेच अमृता फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यात ट्विटरवॉर सुरु झालं होतं. या घडामोडीवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वैयक्तिक स्तरावर राजकारण सुरु आहे. राजकारणात सगळ्या गोष्टींना माणसाने तयार असायला हवं. पण यात अनेकांचे चेहरे उघड झाले. अमृता फडणवीस हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा स्वत:चा छंद, आवडी आहेत. पण जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट केले जाते. राजकारणात मी पातळी सोडली नाही आणि कधीच सोडणार नाही. अमृता फडणवीस कधीच राजकारणात येणार नाही हे मी बोललेला जपून ठेवा असं त्यांनी म्हटलं आहे. न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मलिक आणि फडणवीस यांच्या शाब्दिक युद्ध
राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्स माफियांशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवल्डशी संबंध असल्याचा, तसेच त्यांच्या जावयाच्या घरात अमली पदार्थ सापडल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याविरोधात मलिक यांची कन्या निलोफर मलि-खान हिने घरात ड्रग्स सापडल्याचा आरोप करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच फडणवीसांनी लेखी माफी न मागितल्यास त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला होता. तर त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या काही फोटोंवर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिक यांना अब्रुनुकसानीची नोटिस पाठवली होती. तसेच या प्रकरणी जाहीर माफी मागून ४८ तासांत हे ट्विट डिलिट करा, अन्यथा अब्रुनुकसानीच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी तयार राहा, असा असा इशारा दिला होता.
काय होतं प्रकरण?
ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहेत. काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस यांचे नदी संरक्षणाबाबत एक गाणं आले होते. त्या गाण्यामध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनीही काम केले होते. तर अमृता फडणवीस आणि सोनू निगम यांनी गायन केले होते. त्या गाण्याच्या निर्मितीसाठीचा फायनान्शियल हेड म्हणून जयदीप राणा काम पाहत होता, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.