तळेगाव ढमढेरे : प्रतिनिधी
महाराष्ट्र सुधारण्यासाठी बालविवाह रोखणे काळाची गरज असून, त्यासाठी लोकप्रतिनिधीसह समाजाचीही जबाबदारी आहे. महिलांवरील अन्याय व अत्याचार याविरुद्ध आमचा लढा असून, महिलांना आत्मसन्मान मिळवून देणे ही महिला आयोगाची जबाबदारी आहे असे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कार समारंभात चाकणकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिरूर- हवेलीचे आमदार ऍड.अशोक पवार होते. रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल येथील श्रीसंत सावता महाराज मंगल कार्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामस्थांतर्फे नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी चाकणकर पुढे म्हणाल्या की, राज्य महिला आयोगामार्फत आदिवासी महिलांसह सर्व स्तरातील महिलांना न्याय दिला जाईल. महिलांवरील अन्यायाविरुद्ध आमचा लढा राहील. महिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. बालविवाह रोखणे ही सामाजिक जबाबदारी आहे. वंशाच्या दिव्यासाठी मुलींची हत्त्या करू नका. आमचा लढा समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा व प्रथा याविरुद्ध आहे. महिलांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.आगामी तीन वर्षाच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणार आहे. राज्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील महिला दक्षता कमिटी कार्यरत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. महिलांवर अन्याय व अत्याचार होत असेल तर ग्रामीण भागासाठी ११२ आणि शहरी भागासाठी १०९१ या हेल्पलाइनवर कळवील्यास तातडीने पोलिसांकडून सेवा मिळेल असे चाकणकर सांगितले. तळेगाव ढमढेरे पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या सत्कारामुळे जबाबदारी वाढली असून, महिला आयोग सर्व महिलांना आपला व माहेरचा वाटेल असे काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार अशोक पवार म्हणाले की, महात्मा जोतिबा फुले यांनी दिलेली समतेची शिकवण समाजाला मिळालेली शिदोरी आहे.महिलांचे अनेक प्रश्न असून आयोगामार्फत तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावा. महिलांच्या तक्रारींची ऍपद्वारे नोंदणी करावी. रुपाली चाकणकर यांना फार कमी वयात हे पद मिळाले असून त्यांनी केलेले कार्य व सांभाळलेल्या जबाबदारीची धुरा जनमानसात रुजल्याने हे पद देऊन महिलांचा सन्मान वाढविला असल्याचे ऍड पवार यांनी सांगितले.यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष विद्या भुजबळ, प्रा.शितल नरके यांची भाषणे झाली.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवीबापू काळे, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सुजाता पवार, दूध संघाचे ज्येष्ठ संचालक बाळासाहेब ढमढेरे, पंचायत समितीच्या सभापती मोनिका हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, डॉ. वर्षा शिवले, बाजार समितीचे सभापती काकासाहेब कोरेकर, उपसभापती प्रवीण चोरडिया, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वासकाका ढमढेरे, अनिल भुजबळ व विकासआबा शिवले, संतोष रणदिवे, माजी सभापती शंकर जांभळकर, घोडगंगा कारखान्याचे संचालक पोपटभाऊ भुजबळ व बाळासाहेब ढमढेरे, काँग्रेसचे जिल्हा खजिनदार महेशबापू ढमढेरे, ज्येष्ठ नेते श्रीकांत सातपुते, माजी सरपंच बाळासाहेब भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष सुदीप गुंदेचा, भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच नवनाथ ढमढेरे, रामेशदादा भुजबळ, खरेदी विक्री संघाचे संचालक संभाजी भुजबळ व शहाजी ढमढेरे, सरचिटणीस सुनील ढमढेरे, ऍड सुरेश भुजबळ, विविध राजकीय पक्षांचे आजी- माजी पदाधिकारी, विविध संघटना, शिक्षणसंस्था व विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.