पुणे : प्रतिनिधी
भाजप राज्य सरकारमध्ये असताना भामा आसखेड, समान पाणी पुरवठा योजना, रिंग रोड, विमानतळ यासह अनेक प्रकल्प रखडले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सर्वच प्रकल्पांना गती मिळाली आहे. आगामी काळात आम्ही पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असा दावा महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेत केला.राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख, शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे यावेळी उपस्थित होते. प्रशांत जगताप म्हणाले, ‘‘पुण्याच्या विमानतळासाठी अर्थसंकल्पात ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २६ हजार कोटीचा रिंग रोड तयार केला जाणार आहे, त्याचे ९० टक्के भूसंपादन झाले आहे. यासह अनेक कामे या सरकारने केली. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी, एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना भाजपने भडकावल्याने त्यांनी आत्महत्या केल्या.देशपांडे म्हणाले, ‘‘ महाविकास आघाडी सरकार एकत्रित प्रयत्नांमधून काम करत आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समाजकारणाचा वसा उद्धव चालवत आहेत. सकारात्मक, कृतीवर भर देणारे सरकार आहे.’’‘‘महाविकास आघाडी सरकार पडणार असे रोज भाजपचे नेते सांगत आहेत. हा भाजप म्हणजे भारतीय ज्योतिष पक्ष झाला आहे. आमचे सरकार स्थिर असून, पूर्णकाळ टिकेल. उलट भाजपने कोरोना काळात लसीकरणासह इतर गोष्टीत पक्षपाती राजकारण केले आहे, असा आरोप काकडे यांनी केला.काँग्रेस अनुपस्थितशहरात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेसोबत जवळीक तर काँग्रेससोबत दुरावा निर्माण झाला आहे. एटीएमएसच्या विषयाला मुख्यसभेत भाजपला साथ दिल्याने काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असूनही काँग्रेसचे शहराध्यक्ष किंवा त्यांचा पदाधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री काँग्रेस भवनात आल्याने रमेश बागवे आले नसल्याचे काकडे यांनी सांगितले.