पुणे प्रतिनिधी:
जगात
एकीकडे ओमिक्रॉन नामक कोरोनाचा नव्या विषाणू धुमाकूळ घालत आहे. या भीतीमुळे पुन्हा
लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असले तरी एकेकाळी जिल्ह्यात धुमाकूळ
घातलेला विषाणू आता हळूहळू हद्दपार होत आहे. या आठवड्यात हॉटस्पॉट गावांची संख्या
पुन्हा घटली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत ८ गावांत १० पेक्षा जास्त रुग्ण आहेत. हे
चित्र दिलासादायक असले तरी विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे आता पुन्हा सतर्क
राहावे लागणार आहे.
जिल्ह्यात
एप्रिल महिन्यापासून कोरोनाने उच्चांक गाठला होता. दुसऱ्या लाटेत मे महिन्यापासून
मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली गेली. रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात
वाढल्याने दवाखान्यात खाटासुद्धा मिळणे कठीण झाले होते. त्यात ऑक्सिजनचा पुरवठा
कमी पडल्याने चिंतेत आणखी भर पडली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने आणि आरोग्य विभागाने यानंतर
प्रतिबंधात्मक उपाय योजनांवर प्राधान्याने भर दिल्याने कोरोना बाधित आटोक्यात आले.
जिल्ह्यात
लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले.
असे असले तरी ग्रामीण भागात १०पेक्षा जास्त रुग्ण असणाऱ्या हॉटस्पॉट गावांची
संख्या मोठ्या प्रमाणात होती. १०० च्या वर या गावांचा आकडा होता. या गावात
प्राधान्याने रुग्णसंख्या कमी करण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहीम प्रशासनाने आखली.
घरोघरी जाऊन संशयितांची तपासणी करण्यात आली. यात अनेक बाधित आढळल्याने त्यांना
योग्य उपचार वेळीच मिळाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले.
सध्याच्या
स्थितीत जिल्ह्यात ८ गावांत १० पेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या आठवड्यात
११ गावे ही हॉटस्पॉट होती. आंबेगाव तालुक्यात १, हवेली तालुक्यात ४, शिरुर
तालुक्यात २, तर दौंड तालुक्यात १ अशा ८ गावात १०पेक्षा
जास्त रुग्ण आहेत.
सर्वात
जास्त क्रियाशील रुग्ण असलेल्या हॉटस्पॉट ग्रामपंचायती
जिल्ह्यात
८ गावांत सर्वाधिक क्रियाशील रुग्ण आहेत. यात वाघोलीत ३८, मांजरी बुद्रुक २४,
निमोणे १९, मांडवगण फराटा १८, नऱ्हे १८, वरवंड १४, नांदेड १३,
मंचर १२.
७ लाख ३३
हजार ७०७ जणांची नमुना तपासणी
जिल्ह्यात हॉटस्पॉट गावात रुग्णसंख्या आटाेक्यात आणण्यासाठी धडक सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत नमुना तपासणी करण्यात आली. त्यानुसार ७ लाख ३३ हजार ७०७ जणांची रुग्णतपासणी करण्यात आली.