पिंपरी प्रतिनिधी:
वाहन चोरट्यांच्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातून वाहन चोरीचे प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे वाहनधारक धास्तावले आहेत. शहरातून सात दुचाकी तसेच एक टेम्पो चोरीला गेला. या वाहनचोरी प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी (दि. २८) गुन्हे दाखल करण्यात आले.
श्रीराम मारुती भोसले (वय ५५, रा. संतनगर, मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने त्यांचा दोन लाख रुपये किमतीचा पिकअप टेम्पो त्यांच्या राहत्या घराच्या सोसायटीसमोर रस्त्यावर पार्क केला होता. अज्ञात चोरट्याने ते वाहन चोरून नेले. वाहन चोरीचा हा प्रकार शनिवारी (दि. २७) रात्री पावणेबारा ते रविवारी (दि. २८) सकाळी सात या कालावधीत घडला. चाकण, निगडी, भोसरी, पिंपरी, दिघी, तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक अशा एकूण सात दुचाकी चोरीला गेल्या आहेत.