नागपूर प्रतिनिधी:
मेलेल्या
उंदराला कुतूहलाने बघण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा तलावात तोल गेला. आवतीभोवती
कुणीही नव्हते. कुणाच्याही ध्यानात ही बाब आली नाही. यातच तलावात बुडून
चिमुकल्याचा हकनाक बळी गेला. शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास उमरेड येथील
हिरवा तलावात ही घटना घडली.
सानिध्य
दिनेश बावनकुळे असे या चारवर्षीय चिमुकल्याचे नाव आहे. मंगळवारी पेठ येथील निवासी
दिनेश बावनकुळे हे मोलमजुरीची कामे करतात. नेहमीप्रमाणे दिनेश सकाळीच बाहेर गेले.
दरम्यान सकाळी ९ वाजताच्या सुमारास एका इसमाने घरातील मेलेला उंदीर पकडून तो हिरवा
तलावाकडे नेला. त्या माणसाच्या अगदी मागोमाग सानिध्यसुद्धा गेला. त्या इसमाने
उंदीर तलावाच्या काठावर फेकून दिला आणि तो घराकडे परतला. दुसरीकडे सानिध्य
तलावाशेजारीच खेळत बसला. अशात तोल गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. उमरेड
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून, पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर करीत
आहेत.
शोधाशोध
व सोशल मीडिया
सकाळी ९
वाजतापासून गेलेला सानिध्य परत आला नाही. या कारणाने त्याच्या आईने आवतीभोवती
विचारणा केली. सानिध्यची शोधाशोध सुरू झाली. एकुलता एक सानिध्य आताच घरी खेळत
असताना अचानक कुठे गेला, या विचारचक्राने सारेच भंडावून गेले. सोशल मीडियावरसुद्धा त्याचे
छायाचित्र आणि पोस्ट ‘फॉरवर्ड’ केली
जात होती. अखेरीस तलावाच्या शेजारीच तो खेळत होता, असा
सुगावा लागला. पोलिसांना सूचना देण्यात आली. तलावात शोध घेतल्यानंतर काही तासातच
त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
सुरक्षात्मक
कुंपण करा
उमरेड
नगरपालिकेने ऐतिहासिक हिरवा तलावाचे सौंदर्यीकरण केले. या ठिकाणी नागरिकांसाठी
आसनव्यवस्था करण्यात आली आहे. छोटासा बगिचासुद्धा साकारला गेला आहे. यामुळे
परिसरातील ज्येष्ठ नागरिक आपल्या नातवंडांसोबत या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येत
असतात. आजी-आजोबांसोबत नातवंडे खेळत असतात. अशावेळी नागरिकांची साधारणत: गर्दी
असते. निदान हिरवा तलावाच्या सभोवताल आणि काही धोकादायक ठिकाणी सुरक्षात्मक कुंपण
करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
x