समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, मोठी मंडळी खरेदी करण्यात व्यस्त तर महिला साफसफाई, फराळ
बनवण्याच्या गडबडीत असतानाच बालगोपाळ किल्ले बनवण्यात मग्न झाले आहेत. आजच्या
स्मार्ट युगातील या किल्लेदारांची तोफा, हत्ती, घोडे, मावळे तयार झाले असून घोडेगाव येथील बाजारात
विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील कुंभार आळीमध्ये
करागिर हजारोंच्या संख्येने किल्ल्यावरील मूर्ती, चित्रे
तयार करतात. घोडेगाव व पंचक्रोशीत तयार होणा-या चित्रांना पुणे जिल्हयात मोठया
प्रमाणात मागणी असते. रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून चित्रे
तयार केली जातात. शिवाजी महाराज, मावळे, सैनिक, वाघ, हत्ती, तोफा, उंट, घोडे आदिंचा संच
२०० रूपयांना उपलब्ध आहे. तसेच या चित्रांबरोबर देवदेवतांची चित्रे, मुर्ती तयार करण्यात आली आहेत.
दिवाळीची सुरू होताच दगड, माती, मावळे, शिवाजी महाराज
यांची जमवाजमव करणारी शाळकरी मुले आता फक्त ग्रामीण भागातच दिसुन येत आहे. तर शहरी
भागात मुलांना किल्ले बनविण्याची हौस असली तरी अलीकडे माती उपलब्ध होत नाही.
सोसायटीच्या पार्कींगमध्ये मुलांनी चिखलकाम केल्यास भिंतीवरचा रंग जातो. व्हरांडा
खराब होतो म्हणून अनेक सभासद आक्षेप घेतात. यावर मार्ग काढण्यासाठी रेडिमेड किल्ले
घेत आहे.
ग्रामीण भागामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून
किल्ल्यांबाबत जास्तीतजास्त माहिती गोळा करून त्यांना आधुनिक, आकर्षक रूप देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. किल्ल्यांच्या आजुबाजुला
हिरवळीसाठी मोहरी पेरण्यासाठी बच्चे कंपनी घरच्यांची मदत घेते. रात्री किल्ला
आकर्षक दिसावा म्हणून अनेक बालगोपाळ किल्ल्यावर विदयुत रोषणाई करत आहे.