शिरूर प्रतिनिधी:
पिंपरखेड ता शिरूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेवर टाकलेला २ कोटींपेक्षा अधिक रकमेचा सशस्त्र दरोडा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघडकीस आणला असून यातील २ कोटी १९ लाख किंमतीचे ७ किलो ३२ तोळे दागिने व १८ लाख रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली असून या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दि. २१/१०/२०२१ रोजी दुपारी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरखेड गावचे हद्दीत बँक ऑफ महाराष्ट्र, पिंपरखेड शाखेमध्ये पाच अनोळखी इसमांनी येऊन कॅशियर, बँकेच्या कर्मचारी व हजर ग्राहकांना हातातील पिस्तुलचा धाक दाखवून कॅशियर यास हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देवून नमूद बँकेतील रू. ३२,५२,५६०/- रोख रक्कम व रू. २,४७,२०,३९०/- किंमतीचे ८२४ तोळे असे एकूण २,७९,७२,९५०/- सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम दरोडा टाकून चोरुन नेले बाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला होता.
सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याचे सदर गुन्हयाचे ठिकाणी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया कोल्हापूर परिक्षेत्र, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. श्री. अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांनी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना सुचना देऊन स्थानिक गुन्हे शाखा, शिरुर व दौंड उपविभागाची अशी ५ तपास पथके तयार करून तपासकामी रवाना केलेली होती.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा पथकास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा १) डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ, रा वाळद, ता. खेड, जि पुणे याने त्याचे साथिदारासह केला असल्याची माहीती मिळाल्याने सदर आरोपीचा शोध घेत असताना तो मध्यप्रदेश येथे गुन्हा करून गेल्याची माहीती प्राप्त झाली त्यामुळे एक पथक आरोपीचे शोधाकरीता मध्यप्रदेश येथे रवाना केले त्यानंतर सदरचा आरोपी हा अहमदनगर येथील निघोज, ता. पारनेर, जि. पुणे येथे येणार असल्याची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने नमुद आरोपीस निघोज येथून ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने हा गुन्हा हा त्याचे साथीदार २) अंकुर महादेव पाबळे, रा कावळपिंपरी, ता. जुन्नर, जि. पुणे, ३) धोंडीबा महादु जाधव, रा. निघोज कुंड, ता. पारनेर, जि. अ.नगर, ४) आदिनाथ मच्छिद्र पठारे, रा. पठारवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर, ५) विकास सुरेश गुंजाळ, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या मदतीने केला असल्याची माहीती दिली. त्यावरून त्या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हयातील गेले मालाबाबत त्यांचेकडे तपास करून गेले मालापैकी रू. २,९९,९५,३७०/- किंमतीचे ७ किलो ३२ तोळे दागिने व १८, २७,५९०/- रोख रक्कम असा एकूण रू. २,३६,४२,९६०/ आहे. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान आरोपींनी मागील ३ महीन्यांपासून सदर बँकेवर दरोडा टाकण्याची पुर्वतयारी केलेली होती. त्यादरम्यान टोळीतील प्रमुख डॉलर उर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याने मध्यप्रदेश येथून पिस्टल प्राप्त करून घेतले, गुन्हा करण्याकरीता २ गाड्यांचा वापर केलेला असून मेटॅलीक ग्रे रंगाची सियाज कार नं. एम.एच. ०५ सी.एम. १२९३ ही आरोपींना गुन्हा करण्याकरीता वापरावयाची असल्यामुळे आरोपींनी तिला पांढरे रंगाची करून घेतली होती व गुन्हा केल्यानंतर तिचा रंग बदलून घेण्यासाठी मध्यप्रदेश येथे नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीसांना चकवा देण्याकरीता दरोडा टाकल्यानंतर सियाज कारमधून दरोडा टाकून चालविलेली रक्कम निळया रंगाची बोलेनो गाडी नं. एम.एच. १४ एस.एम.०७०७ हीमध्ये टाकून मुद्देमाल लंपास केलेला होता. तसेच आरोपींनी स्वतःची ओळख लपून रहावी याकरीता गुन्हा करण्यापुर्वी एकाच प्रकारची जॅकेट, शुज, ट्रॅक पॅन्ट, हॅण्डग्लोव्हज्, मास्क अशी कपडे खरेदी करून त्या कपड्यांचा वापर करून गुन्हा केलेला आहे. गुन्हा केल्यानंतर कपडे जाळून टाकलेली आहेत अशाप्रकारे विविध क्लुप्त्या वापरून गुन्हा केलेला असतानाही पुणे ग्रामीण पोलीसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळालेले आहे.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहा पोलीस निरीक्षक सचिन काळे, संदिप येळे, नेताजी गंधारे, सहा. पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, सहा फौज तुषार पंधारे, शब्बीर पठाण, पोलीस हवालदार जनार्दन शेळके, राजु मोमीन, दिपक साबळे, विक्रम तापकीर, सचिन घाडगे, विजय कांचन, अजय घुले, अनिल काळे, रविराज कोकरे, पो.ना. योगेश नागरगोजे, गुरू जाधव, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहिवळे, सहा फौज, विजय माळी, प्रकाश वाघमारे, काशीनाथ राजापुरे, मुकुंद कदम, प्रमोद नवले, प्रसन्न घाडगे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, संदिप वारे, धिरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेंडगे, प्राण येवले, बाळासाहेब खडके, म.पो.कॉ. पुनम गुंड, समाधान नाईकनवरे, दगडु विरकर यांनी केलेला असून त्यांना शिरूर पोलीस स्टेशनकडील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहा. पोलीस निरीक्षक संदिप कांबळे, पो.स. ई.श्री. जगदाळे, श्री.पडळकर, श्री. जाधव, म.पो.स.ई.चरापले, सहा.फौज पठाण, पो.हवा. भगत, अमित कडूस, साठे, पो. ना. नितीन सुद्रीक, बाळासाहेब भवर, शिंदे, जगताप, संजु जाधव, पो.कॉ. नागलोत, नेमाणे, साळवे, जंगम, गुणवरे, पिठले, साळुंके यांनी देखील तपासात मदत केलेली आहे.
अटक झालेल्या आरोपीपैकी डॉलर ऊर्फ प्रविण सिताराम ओव्हाळ याचेवर १) घोडेगाव पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा, २) खेड पोलीस स्टेशन येथे मारामारीचा व इतर गुन्हे दाखल आहेत .आरोपी अंकुर महादेव पाबळे याचेविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा, आरोपी धोंडीबा महादु जाधव याचेविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा, दरोडा,व इतर गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.