पुरंदर प्रतिनिधी:
पुरंदर
तालुक्यातील बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गटातील गावागावांत आपण अवघ्या १९ टक्के
रकमेतून शेतकऱ्यांना पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी दिले. त्यामुळे अवघ्या काही
वर्षांपूर्वी ओसाड असलेल्या या भागात आज हजारो एकर ऊस पाहायला मिळतोय.
गावे सुधारली, तरीदेखील या
भागातून आपल्याला समाधानकारक मतदान झाले नाही. आज मात्र संपूर्ण पुरंदर तालुका
पश्चात्ताप व्यक्त करीत आहे. साध्या साध्या गोष्टीलासुद्धा आपल्या लोकप्रतिनिधीला
इतरांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. हा त्रास आपणच स्वतःला करवून घेतला आहे, अशी खंत माजी
जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केली.
पिसर्वे (ता.
पुरंदर) येथील कार्यक्रमात माजी मंत्री शिवतारे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद
सदस्य दिलीप यादव, युवा सेनेचे अध्यक्ष मंदार गिरमे, सासवड
शहरप्रमुख अभिजित जगताप, उमेश गायकवाड, रमेश इंगळे, माणिक
निंबाळकर, गणेश मुळीक, सागर मोकाशी, सरपंच
बाळासाहेब कोलते, रवींद्र कोलते, यांच्यासह
मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
मी भगवा हाती
घेतला, तेव्हा पुरंदर तालुक्यातील साधा ग्रामपंचायत
सदस्यसुद्धा माझ्यासोबत नव्हता. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे दिग्गज नेत्यांची फौज
होती. राजकारणात काडीचंही स्थान नसलेल्या सामान्य पोरांनी शिवसेनेला घराघरांत
पोचवलं आणि २००९ ला तालुक्यात भगवा फडकवला, असे माजी
राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आपल्या शिवसेनेतील राजकीय प्रवासाबाबत सांगितले.
ज्यांना समाजकार्याची
आवड आहे,
त्यांनी पुढे यावे, अशा इच्छुकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विजय शिवतारे यांनी करून नवीन युवकांना शिवसेना, युवासेना, विद्यार्थीसेना अशा संघटनांमध्ये, व महिलांना महिला आघाडी आणि युवती सेनेमध्ये विविध पदांवर सामावून घेणार असल्याचे शिवतारे यांनी जाहीर केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.