मंचर प्रतिनिधी:
अवसरी खुर्द येथील ग्रामविकास अधिकारी यांना शिवीगाळ व दमदाटी केल्या प्रकरणी विशाल विलास भोर याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,अशी माहिती पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांनी दिली.या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ बाबा शिदोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.
या बाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील ग्रामपंचायत कार्यलयात 20 ऑगस्ट रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तक्रारदार शिदोरे,सरपंच जगदीश अभंग, ग्रामपंचायत सदस्य सचिन ढोणे गावातील विकासाच्या दृष्टीने चर्चा करत असताना विशाल विलास भोर (रा.अवसरी खुर्द ता आंबेगाव) याने ग्रामपंचायत मध्ये येऊन घराचा उतारा मागितला,त्यास थकीत घरपट्टी भरण्यास ग्रामविकास अधिकारी यांनी सांगितले असता विशाल भोर याने मी थकीत घरपट्टी आत्ता व यापुढे देखील भरणार नाही,तुम्हाला काय करावयाचे असेल ते करा,मी तुम्हाला काम करू देणार नाही,असे म्हणत ग्रामविकास अधिकारी शिदोरे यांना शिवीगाळ, दमदाटी करत समोर असलेल्या टेबलवर जोरजोरात हात आपटत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विशाल भोर याच्या विरुद्ध ग्रामविकास अधिकारी शिदोरे यांनी तक्रार दाखल केली आहे,पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश डावखर करत आहे.