मंचर प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील १ लाख ८ हजार १३० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत
सहभाग घेतला असून शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेत सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व
व्याजातील सूट अशी एकूण २८४ कोटी ३७ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये २८ हजार ५८७
शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले असल्याची माहिती महावितरणचे
प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिली.
कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या
वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी जुन्या थकबाकीमध्ये तब्बल ६६ टक्के सूट देण्यात
येत आहे. शिल्लक थकबाकीपैकी ५० टक्के थकबाकी येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास
उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. सद्यस्थितीत महावितरणची आर्थिक
स्थिती अतिशय खालावली आहे. त्यामुळे थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नाही व चालू
वीजबिलांचा भरणा नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत
आहे.
कृषिपंप वीजजोडणी धोरणाची गावागावांमध्ये जागृती करून महावितरणकडून
शेतकऱ्यांना वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या योजनेत
सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषिपंपांच्या वीजबिलांचे किमान चालू वीजबिलांचा
भरणा करणे आवश्यक आहे. तसेच भरलेल्या थकीत व चालू बिलांच्या रकमेतील ६६ टक्के
रक्कम ही ग्रामपंचायत व जिल्ह्यातील ग्रामीण वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत
विकासासाठी खर्च करण्यात येत आहे.