निरगुडसर प्रतिनिधी:
आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथून जाणाऱ्या पुणे नाशिक
सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी बाधित शेतकऱ्यांनी शेतीची मोजणी करून देण्यास
अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला आहे. हा विरोध करण्यासाठी सर्व शेतकरी एकत्र आले होते.
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या बागायती
जमिनीचे भूसंपादन न करता वनक्षेत्राच्या पडीक / माळरान जमिनीचे भूसंपादन करावे अशी
शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे मागणी केली.
या रेल्वे प्रकल्पामध्ये तांबडेमळा गावातून रेल्वे प्रकल्प नेल्यास आमच्या बागायती जमिनीचे क्षेत्र जात आहे. आम्ही आमच्या जमिनी गावाच्या ओढ्यावर बंधारे, डिंभे उजवा तीर कालवा यामधून स्वखर्चाने पाईप लाईन करून पाणी आणून आमचे क्षेत्र बागायती केले आहेत. या शेती व्यवसायावरच आमच्या कुटुंबाचा उदर्निवाह होतो. आम्ही अल्प भूधारक शेतकरी आहोत ,सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी आमच्या शेतीवर हातोडा घालून आमच्यावर अन्याय करू नये. विकासासाठी रेल्वे प्रकल्प महत्वाचा आहे परंतु त्यासाठी आमच्या जमिनीचे भूसंपादन न करता गावाच्या शेजारी असलेल्या वन विभागाच्या पडीक क्षेत्रातून भूसंपादन करावे अशी मागणी यावेळी बाधित शेतकऱ्यांनी केली.
या बाबत तांबडेमळा ग्रामपंचायतच्या विशेष ग्रामसभेत पुणे नाशिक हाय स्पीड रेल्वेला ग्रामस्थांनी एकमताने विरोध करत ठराव मंजूर केला आहे.या ग्रामसभेत सरपंच ज्ञानेश्वर भोर यांनी आभार मानले त्या प्रसंगी उपसरपंच धनश्री तांबडे, पोलीस पाटील सोनाली ताबडे, तंटामुक्ती अध्यक्ष गौरव भोर, शिवाजी तांबडे, माजी मुख्यध्यापक नथुराम तांबडे, दत्ता तांबडे, विश्वास भोर, माजी सैनिक गंगाराम भोर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, आदी उपस्थित होते.