नांदेड प्रतिनिधी:
लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे सोमवारी ढगफुटी झाली आहे. त्यामुळे अचानक नदी - नाले तुडुंब भरून वाहिले. मुसळदार पावसानंतर शेतात गेलेले दगडगावे कुटुंब बैलगाडीत बसून गावाकडे रिसनगावकडे निघाले. रस्त्यात हुलायवाडीची नदी ओलांडून घराकडे येत असतानाच जोरदार पुराची लाट आली. त्यात बैलगाडी उलटून त्यात गाडीतील पाचजण नदी प्रवाहात वाहून गेले.
या भीषण घटनेमध्ये
दोन सख्ख्या जावा बुडून मरण पावल्या आहेत. तर तिघाजणांनी नदीपात्रातील
झाडेझुडपांना घरून स्वतःचा जीव वाचविला. या घटनेमुळे सावरगावावर शोककळा पसरली.
नगर जिल्ह्यात
ढगफुटीसदृश पाऊस
बंगालच्या उपसागरावर
तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठावाडा विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात
पाऊस सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. जिल्ह्यात
अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून पाथर्डी तालुक्यात १९३ मिलीमीटर पावसाची नोंद
झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे. पाथर्डी
तालुक्यात घरे पडली, पिकांचेही नुकसान झाले आहे. पुढील काही तास पाऊस
सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवान विभागाने वर्तविला आहे.
चाळीसगाव तालुक्यात
मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. यामुळे गिरणा धरणाखालील गिरणा नदीसह उपनद्यांना व
नाल्यांना मोठा पूर आलेला आहे. छोटे-मोठे बंधारे, पाझर
तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पुराचे पाणी गिरणा नदीत येऊन मिळत आहे.
सद्यस्थितीत जामदा बंधार्यावरून १ हजार ५०० क्यूसेक पाणी जात असून, दुपारनंतर त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.
गिरणा नदी काठावरील गावांना धोक्याचा इशारा देण्यात
आला आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील गिरणा नदी पात्रात आज दुपारनंतर पूरपरिस्थिती
निर्माण होऊ शकते. दरम्यान, तितूर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आल्याने
शहरात पाणी घुसले. नदीकाठी असलेली घरे तसेच बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी
घुसल्याने नुकसान झाले आहे. बामोशी बाबा दर्गा परिसर, रोशननगर, जहांगीरदार
वाडी, बाराभाई मोहल्ला, शिवाजीनगर, घाट रोड
भाजीबाजार हा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित
झाल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत.
गेल्या अनेक
दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसाने काल रात्रीपासून जळगाव जिल्ह्यात जोरदार पुनरागमन
केले आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये
पाणी तुंबले असून गिरणा व तितूर नद्यांना पूर आला आहे. तितूर नदीला आलेल्या
पुरामुळे कजगाव-नागद, खाजोळा-नेरी-नागद रस्ता बंद झाला आहे. या गावांचा
रात्रीपासून संपर्क तुटला आहे. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळल्याने
वाहतूक ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून उपाययोजनांना सुरुवात झाली आहे.