केसनंद प्रतिनिधी:
हवेली तालुक्यात एका
शेतकऱ्याला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जबरदस्तीने जमिनीचे गहाण खत करुन परस्पर ६
कोटी ७५ लाख रुपये काढून घेत बोजा कमी करण्यासाठी पून्हा एक कोटी मागितल्याप्रकरणी
पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम
समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल व साथीदारांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुणे जिल्हा
कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे.
गुन्हा दाखल केलेल्यामध्ये संदीप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे
आणि शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी आदींचा समावेश आहे. याप्रकरणी गंगाराम
सावळा मासाळकर (वय ७४, रा. वढु खुर्द, ता. हवेली) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
या प्रकरणाची थोडक्यात हकिकत अशी : सन २०१३ मध्ये फिर्यादी गंगाराम
सावळा मासाळकर यांच्या मालकीच्या मौजे वढू खुर्द, (ता. हवेली, जि. पुणे) येथील गट क्र. १५३/१
मध्ये ३ हेक्टर ७१ आर या जमिनीचे गहाणखत आपसात संगनमताने करण्यासाठी मंगलदास बांदल, संदिप भोंडवे, विकास भोंडवे, सचिन पलांडे व शिवाजीराव भोसले बँकेतील एक अधिकारी यांनी
फिर्यादीला त्यांच्या चारचाकी मोटारीमध्ये डांबून ठेवून दमदाटी करून व
रिव्हॉल्वरचा धाक दाखवून जबरदस्तीने करून एकूण सहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये
परस्पर काढून घेतले. तसेच जमीनीवरील बोझा कमी करण्यासाठी त्यांनी एक कोटी रुपयाची
मागणी केली.
संबंधित व्यक्तींचे राजकीय लागेबांधे असल्याने त्याच्याविरोधात
तक्रार दिल्यास कुटुंबियांना त्रास देतील म्हणून फिर्यादीने आतापर्यंत तक्रार
दिलेली नव्हती. परंतु अदयापपर्यंत जमीनीवरील बोझा कमी केला नाही, म्हणून फिर्यादीने त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने शहर
पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै. संदीप
भोंडवे व विकास भोंडवे यास अटक केली आहे. अधिक तपास पुणे शहर गुन्हे शाखेच्या
यूनिट सहाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, शिरूर तालुक्यामध्ये शिक्रापूरात
दत्तात्रेय मांढरे यांच्या अशाच फिर्यादीवरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात बांदलसह
इतरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडी
मिळालेल्या बांदलवर आता हवेलीतही गुन्हा दाखल झाल्याने बांदलसह इतर साथीदारांच्या
अडचणीतही वाढ झाली आहे.