नारायणगाव प्रतिनिधी:
शेजाऱ्यांच्या भांडणाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी नारायणगाव (खोडद रोड) येथील अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीतील एकाच कुटुंबातील पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आज सायंकाळी अटक केली आहे. अशी माहिती फौजदार गुलाब हिंगे पाटील यांनी दिली.
अनिता संभाजी पडवळ (राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी) या महिलेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसांनी राहुल गंगाधर दुशिंग, रुपाली राहुल दुशिंग, प्रविण गंगाधर दुशिंग, राजश्री प्रविण दुशिंग, गंगाधर भागाजी दुशिंग (सर्व राहणार अष्टविनायक रेसिडेन्सी खोडद रोड नारायणगाव,तालुका जुन्नर) एकाच कुटुंबातील पाच जणांना अटक आहे.
याबाबत फौजदार हिंगे पाटील म्हणाले आरोपी व अनिता पडवळ हे अष्टविनायक रेसिडेन्सी सोसायटीत शेजारी राहण्यास होते. आरोपी हे अनिता पडवळ यांना वेळोवेळी टोमणे मारूण मानसिक त्रास देत होते. भांडणातून आरोपींनी अनिता यांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. आरोपींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहुन अनिता यांनी पाटे खैरे मळा येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आज दुपारी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. याप्रकरणी विशाल संभाजी पडवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास फौजदार हिंगे पाटील करत आहेत.