पुणे प्रतिनिधी:
दरवर्षी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला महिला दोरा गुंडाळून हा सण साजरा करतात. पण नंतर तो दोरा तसाच वडाला कित्येक दिवस राहतो. त्यामुळे वडाचे नुकसानही होते. झाडाचा हा त्रास कमी करण्यासाठी दोन तरूणींनी हा दोरा काढून झाडांना मोकळे करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत दहा-बारा वृक्षांचा दोरा काढला असून तो कित्येक किलो भरला आहे. तो सर्व दोरा त्यांनी महापालिकेच्या कचरावेचकांना तो सर्व सुपूर्द केला.
पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे महत्त्व असल्याने त्याच्या विषयी कृतज्ञता
व्यक्त करणे हा पूजेचा एक हेतू समजला जातो. पण वडाभोवती दोरा गुंडाळण्याचे ठोस
कारण मात्र अद्याप कोणालाही समजलेले नाही. पण या प्रथेमुळे मात्र दरवर्षी अनेक
वटवृक्षांना आवळले जाते. त्या वृक्षांच्या भावना दोन तरूणींनी जाणल्या आणि त्यांना
मुक्त करण्याचा निर्धार केला. श्वेता शारदा नथू साठे आणि कल्याणी संध्या या
दोघींनी हा उपक्रम सुरू केला आहे. श्वेता हिने गेल्या वर्षी या कामाला सुरवात केली
होती. त्यानंतर यंदाही कायम ठेवला.
श्वेता ही काही वर्षांपासून अंघोळीची गोळी या मोहिमे अंतर्गत काम करत आहे.
झाडांना जीव असतोच आणि त्यांचा सुद्धा जीव गुदमरुन त्यांना सुद्धा दम लागतो.
झाडांना खिळे ठोकले, दोरे गुंडाळले, तारा गुंडाळल्या की, त्यांचे विघटन झाडामध्ये होत असते. जे
आपल्याला दिसत नाही आणि हे विघटन अर्धवट होते. तारा, खिळे ह्यांना गंज लागतो, तो गंज पर्यायाने झाडाला लागतो. दोऱ्यांचेही
तसेच आहे. पावसाळ्यात हे
दोरे झाडाला आवळून बसतात. त्यामुळे झाडावर विपरीत परिणाम होऊ लागतो. म्हणून हा
उपक्रम सुरू केल्याचे कल्याणी हिने सांगितले.
एका झाडाचा दोरा काढायला दहा मिनिटे लागतात. तो सर्व एकत्र करून
पालिकेच्या कचरावेचकांना देण्यात येतो. मोठ्या वडाच्या झाडाला एका वेळी पाच ते आठ
किलो इतक्या वजनाचा दोरा निघतो.
लोकांना झाडांच्या भावना समजून सांगताना श्वेता म्हणते " झाडांचा जीव
गुदमरतो म्हणून आम्ही त्यांना मोकळं करतोय. सकाळी उठून हे काम करायला जायला
अनेकांना नक्कीच कंटाळा येईल, पण दोऱ्याच्या
कचाट्यातून झाडाला मुक्त केल्याचे एक मोठं समाधान नक्की मिळेल. असे श्वेता शारदा
नथू साठे यांनी सांगितले आहे.