मंचर प्रतिनिधी :
अवसरी ता. आंबेगाव येथील गंगाधर दगडू गाडे यांचेवर सावकारी अधिनियम २०१४ च्या कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल!
पुणे जिल्ह्यात अवैध सावकारीतून अनेक गुन्हेगारी कृत्य झाले असून अलीकडेच जामिनावर बाहेर असलेल्या एका सावकाराने वसुली साठी एकाचे अपहरण करून त्यास पेटवून दिले. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ग्रामीण पोलीस दलाला, सावकारांची गय करू नये अशा सूचना दिल्या होत्या. अशातच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात अवसरी येथील एका अवैध सावकाराच्या मंचर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नारायणगाव ता. जुन्नर येथील सुरेश मांदळे व अशोक तिवारी यांनी अवसरी ता. आंबेगाव येथील गंगाधर दगडू गोरे यांच्या विरोधात मंचर येथील सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक यांचेकडे तक्रार केली होती. तद्नंतर पोलिसांच्या सहकार्याने सहाय्यक निबंधक कार्यालयातील पी. एस. रोकडे, एस. जी. लाडे, चौधरी आदि अधिकाऱ्यांसह दोन पंचांनी अवैध सावकार गोरे यांच्या घरी धाड मारून सह्या केलेले कोरे धनादेश, कोरे स्टॅम्प पेपर, रेव्हेन्यू स्टॅम्प, पैसे हस्तांतरणा संदर्भात काही कागदपत्र ताब्यात घेऊन त्यांची तपासणी केली. तेव्हा गोरे कुठलाही परवाना नसताना अवैध सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले.
गोरे यांच्या अवैध सावकाराची खात्री पटल्यानंतर सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या वतीने मंचर पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून, संबंधित सवकारावर सावकारी कायदा २०१४ च्या कलम ३९ अनुसार गुन्हा दाखल केल्याचे वृत्त असून पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.