आळेफाटा प्रतिनिधी:
जुन्नर-नाशिक- पुणे
व कल्याण- नगर महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आळेफाटा येथील कोट्यवधी
रुपये किमतीच्या मूल्यवान जागा असलेली आळेफाटा बस स्थानक सध्या चक्क कचरा डेपो
बनले आहे. येथे कोणीही यावे व मनसोक्तपणे कचरा टाकावा अशी स्थिती बघायला मिळत आहे.
बस स्थानक प्रशासनाने तात्काळ कचऱ्याची विल्हेवाट लावावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा
इशारा आळेफाटा येथील हरिओम ग्रुप ने दिला आहे.
नाशिक पुणे व
कल्याण नगर महामार्गाच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले आळेफाटा बस स्थानक वडगाव आनंद
ग्रामपंचायत हद्दीत येथे स्थानिक ग्रामपंचायतीने वेळोवेळी येथील कचऱ्याची
विल्हेवाट लावली आहे. मात्र वडगाव आनंद ग्रामपंचायतीकडे कचरा विल्हेवाट लावण्याची
कोणतीही वेगळी सोय नसल्याने बऱ्याच वेळा स्थानकात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग
असतात. दिवसभर मोकाट कुत्रे कचरा चिवडत
असतात. कचऱ्यावर पाऊस पडल्याने तो कुजला आहे.त्यातून दुर्गंधी सुटली आहे.
दुर्गंधीचा त्रास केवळ प्रवाशांना नव्हे तर स्थानिक रहिवाशी व्यापाऱ्यांनाही होत
आहे. या बस स्थानकाचा नियोजनबद्ध विकास करून आळेफाट्याच्या सौंदर्यात भर घालावी, अशी मागणी हरीओम
ग्रुपने केली आहे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.