समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आता खासगी हॉस्पिटल्समध्ये लस मिळणार आहे. महानगरपालिकेला कोविड-१९ लसीचा साठा उपलब्ध झाल्याने सोमवार म्हणजेच १२ एप्रिल २०२१ पासून मुंबईतील ७१ पैकी ६२ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि शासनातर्फे मुंबईत ४९ तर खासगी रुग्णालयात ७१ लसीकरण केंद्रं कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून महानगरपालिका क्षेत्रात दरदिवशी सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.
मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या ७१ खासगी रुग्णालयात, शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ आणि रविवार, दिनांक ११ एप्रिल २०२१ असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. पण मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु होते. लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुन्हा सुरु केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. शुक्रवार, दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी रात्री उशिरा ९९ हजार लसी आणि शनिवार, दिनांक १० एप्रिल २०२१ रोजी १ लाख ३४ हजार ९७० अश्या एकूण २ लाख ३३ हजार ९७० लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे उद्या सोमवार, दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी नियमित वेळेत ७१ पैकी ६२ खासगी लसीकरण केंद्र देखील कार्यान्वित राहतील.