समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
शहरात कोरोनाचा
वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी सध्याचे निर्बंध पुरेसे असून, पूर्ण लॉकडाउनची
गरज नसल्याचे मत केंद्र सरकारच्या पथकाने व्यक्त केले आहे. या पथकाने केंद्र सरकार
आणि राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये कोरोना संकट हाताळणीबाबत पुण्याच्या स्थानिक
यंत्रणांचा केंद्र व राज्य सरकारशी असलेल्या समन्वयावर गंभीर आक्षेप नोंदविले आहेत.
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याच्या
पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पुण्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता. 'करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी
सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध पुरेसे आहेत. पूर्ण लॉकडाउनची गरज नाही,' असे या
अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाच्या
प्रादुर्भावाचा अंदाज न आल्याने ही परिस्थिती उद्भवली असून, गेल्या दोन महिन्यांत दोन्ही
महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडे पुरेसा कालावधी असतानाही फारशा उपाययोजना करण्यात आल्या
नसल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. शहरातील करोना चाचण्यांची क्षमता वाढलेली
नाही. 'एनआयव्ही'सारखी सरकारी यंत्रणा चाचण्या करण्याचे बंद करते; तर दुसरीकडे अद्यावत
तंत्रज्ञान असतानाही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे तयार करण्यात येत नाहीत. कोरोना रुग्णसंख्या वाढलेल्या भागात सूक्ष्म प्रतिबंधित
क्षेत्रे केल्यास निर्बंध कसे लावायचे याचा निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येईल, अशी सूचनाही
या पथकाने केली आहे.