समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राज्यात सध्या गाजत असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांनी सादर केलेल्या अहवालात आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंग कायद्याचा गैरवापर करत शासनाची दिशाभूल केली असल्याचे अहवालात म्हटले आहे. यामुळे रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाईची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्ला यांनी सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी शक्यता वर्तवून काही व्यक्तींच्या फोन टॅपिंगची परवानगी घेतली. यात त्यांनी जाणीवपूर्वक दिशाभूल करून भारतीय टेलिग्राफ अॅक्टखाली परवानगी घेतली असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले असल्याचे अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी शुक्ला यांच्याकडून शासनाने स्पष्टीकरणे देण्याचे आदेश दिले.
अहवालातील तपशीलानुसार, यानंतर रश्मी शुक्ला यांनी मुख्य सचिव सीताराम कुंटे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्यक्तिश: भेट घेऊन झालेल्या प्रकाराबाबत दिलगीरी व्यक्त केली. त्याच प्रमाणे कौटुंबिक व्यथा, विशेषत: त्यांच्या पतींचे कॅन्सरच्या आजाराने झालेले निधन आणि त्यांची मुले शिकत असल्याचे बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. आपली चूक झाल्याचे कबूल करून त्यांनी दिलेला अहवाल मागे घेण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. मात्र शासनाकडे सादर झालेला अहवाल परत देण्याचा कोणताही प्रघात नसल्याचे तशी कार्यवाही करण्यात आली नसल्याचे कुंटे यांच्या अहवालात म्हटले आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई होणार?
या बरोबरच रश्मी शुक्ला यांच्याकडून त्यांनी दिलेल्या अहवालाची प्रत लिक झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. हे पत्र TOP आणि SECRET असताना देखील उघड झाले ही बाब गंभीर आहे. तसेच संशय असल्याची बाब उघड झाल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते असे अहवालात म्हटले आहे.
त्या महिला अधिकारी असल्याने, तसेच त्यांच्या
पतींचे कॅन्सरने झालेले निधन आणि मुले शिकत असल्याचे बाब निदर्शनास आल्याने
सहानुभूती आणि सौजन्याच्या दृष्टीकोनातून प्रस्तावित कारवाई करण्यात आली नाही.
दरम्यानच्या काळात त्यांची केंद्रीय प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शुक्ला यांनी ज्या अधिकाऱ्यांचे फोन टॅप केले
त्यांची प्रायव्हसी धोक्यात आली. तेसेच त्यांची विनाकारण बदनामी झाली. शिवाय
त्यांच्या अहवालात नमूद केलेल्या बदल्यांचे तथाकथित निर्णय व प्रत्यक्षात शासनाने
घेतलेले निर्णय यात कोणतेही साम्य नाही असे अहवालात म्हटले आहे.