समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) येत्या
पाच वर्षांत महामार्गांच्या खासगीकरणाशी संबंधित योजनेवर काम करत आहे. या
माध्यमातून सुमारे 1 लाख कोटी रुपये उभारण्याची तयारी केली
जात आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी
यांनी दिली आहे.
उद्योजकांनी या बाबतीत पुढे येऊन गुंतवणूक करून त्याचा फायदा घ्यावा, असं आवाहन यावेळी गडकरी यांनी केलं. राष्ट्रीय महामार्गांच्या खासगीकरणामुळे प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि हा निधी मजबूत पायाभूत सुविधांच्या विकासांसाठी वापरला जाऊ शकतो, असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
CII च्या एका कार्यक्रमात गडकरी बोलत होते. बाजारात मालमत्ता विक्री किंवा लीज ही उद्योगांसाठी चांगली व्यवसाय संधी आहे. यातून सरकारला पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीचे मूल्य काढण्यास मदत मिळेल. उद्योग आणि सरकार यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल. देशातील पायाभूत सुविधांच्या कामांना या माध्यमातून चालना मिळेल, असं गडकरी म्हणाले. सार्वजनिक अनुदानित राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांना बाजारपेठेत खासगीकरण करण्यासाठी अधिकार NHAI ला देण्यात आले आहेत. तिथं ही योजना राबवण्यात येऊ शकते.