समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
पाकिस्तानचे पंतप्रधान
इम्रान खान यांनी मागील आठवड्यात करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर
त्यांनी गुरुवारी बैठकही घेतली. इम्रान खान यांच्यावर आता पाकिस्तानमधून टीका होत आहे.
करोनाची लागण झाल्यानंतरही इम्रान खान प्रत्यक्ष बैठक कशी करू शकतात, असा प्रश्न उपस्थित
करण्यात येत आहे.
इम्रान खान आणि त्यांची
पत्नी बुशरा बीबी यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर दोघेही विलगीकरणात गेले
होते. मात्र, इम्रान खान यांच्या बैठकीमुळे आजाराच्या गांभीर्याबाबत प्रश्न उपस्थित
होऊ लागले आहेत. या बैठकीत इम्रान खान आणि बैठकीत सहभागी झालेले इतरजणांनी मास्क वापर
केला होता. त्याशिवाय सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करत अंतरही ठेवले होते.
मात्र, इम्रान खान यांना
या बैठकीची इतकी आवश्यकता वाटत होती तर, त्यांनी ऑनलाइन बैठक करायला हवी होती, असाही
सूर उमटत आहे. अनेकांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे उदाहरण दिले. त्यांनाही
करोनाची बाधा झाल्यानंतर ऑनलाइन बैठका घेत देशाचे नेतृत्व केले होते.
पाकिस्तानमधील राजकीय
कार्यकर्ते रझा हरून यांनी म्हटले की, पंतप्रधान इम्रान खान यांनी अतिशय वाईट उदाहरण
समोर ठेवले आहे. ही बैठक इतकी महत्त्वाची होती. तर, त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे बैठकीत
सहभागी व्हायला हवे होते. कोरोना मार्गदर्शक निर्देशांचे
उल्लंघन झाले असल्याचे त्यांनी सांगितले.