समर्थ भारत न्यूज नेटवर्क:
परमबीर सिंह यांच्या शंभर कोटीच्या
आरोपानंतर पोलिस दलात ट्रान्सफर रॅकेट प्रकरणावर प्रथमच भाष्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री
अजित पवारांनी झालेल्या फोन टॅपिंगचा अहवाल आजच गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे
येणार असल्याची दिली आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परीषदेत पोलिस
बदल्यांच्या रॅकेटबाबत आरोप केल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जोरदार पडसाद
उमटले. या प्रकरणात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
काल बुधवारी रात्री उशिरा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना दिले होते. त्यामुळेच
सीताराम कुंटे यांच्याकडून हा अहवाल आजच मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल असे अजितदादा
पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
तत्कालीन गृह विभागाचे सचिव सीताराम कुंटे हे सध्या
मुख्य सचिव आहेत. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाचा अहवाल हा सीताराम कुंटे यांना देण्याचे
आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. या अहवालामध्ये नेमकी काय कारवाई करता येईल याबाबतची
माहिती असणे अपेक्षित आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस खात्यातील काही लोकांनी अतिशय
गंभीर चूक केली आहे. पण ही चूक अतिशय गंभीर असून या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात
येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं. संपुर्ण प्रकरणात सरकार किंवा मुख्यमंत्री कोणालाही
पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.
सीताराम कुंटे हे अतिशय सरळमार्गी अधिकारी आहेत. तसेच अतिशय
पारदर्शक अशी त्यांच्या कामाची पद्धत आहे. बदल्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची माहिती
समोर आल्याने कायदा सुव्यवस्थेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळेच पोलिस
दलालाच जनतेच्या मनातून उतरवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही अजितदादा यावेळी म्हणाले.
पण या संपुर्ण प्रकरणात कोणतीही हयगय केली जाणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रकरणात कुणीतरी दुखावला गेल्या असेल त्यामुळेच अशा पद्धतीची माहिती जाणीवपूर्वक
लिक केली गेली. पण या संपुर्ण प्रकरणात जोवर संपुर्ण माहिती मिळत नाही तोवर काही बोलण
उचित ठरणार नसल्याचेही त्यांनी शेवटी सांगितलं.