समर्थ भारत न्यूज
नेटवर्क:
राज्यात सध्या 'कोव्हिशील्ड'बरोबर 'कोव्हॅक्सिन' लस
देण्यात येत असून, त्यानुसार दोन्ही लशी एकाच केंद्रावर
देताना त्याबाबतचे स्वतंत्र फलक लावण्यात येत आहेत. याशिवाय केंद्रावर आलेला
लशींचा साठा त्याच दिवशी वापरण्यासह विविध दहा नियमांची अंमलबजावणी केली जात आहे.
त्यामुळे लसीकरणाचा 'पुणे पॅटर्न' चर्चेत
आला आहे.
या लसीकरणाच्या पुणे पॅटर्नची चर्चा आता आरोग्य
खात्यात होऊ लागली असून, त्याचे स्वागत होऊ लागले आहे.
पुणे शहर, जिल्ह्यात सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरण
केंद्रावर येणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी काही नियम करण्यात
आले आहेत. 'सर्व खासगी रुग्णालये, तसेच
प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, जिल्हा उप रुग्णालयांमध्ये 'इविन' आणि 'कोविन'चे यूजर आयडी,
पासवर्ड उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रत्येक कोरोना लसीकरण केंद्रांच्या ठिकाणी 'इविन' आणि 'कोविन'चे नोडल अधिकारी नियुक्त करण्यात यावेत. दोन्ही पोर्टलमध्ये माहिती
भरण्याची, तसेच जिल्हास्तरावर रोज सकाळी दहा ते दुपारी पाच
या वेळेत माहिती कळविण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात यावी. त्यासोबत
कार्यक्षेत्रातील सर्व खासगी संस्थांची आकडेवारी घेऊन, ती
जिल्हास्तरावर कळविण्याची जबाबदारी द्यावी, असे नियम केले
आहेत,' अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
तथा जिल्हा आरोग्य समितीचे कार्याध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिली.
ज्या ठिकाणी मोठी रुग्णालये आहेत, तेथे वेगवेगळ्या खोल्यांबाहेर 'कोव्हॅक्सिन' आणि 'कोव्हिशील्ड' लसीकरण असा
उल्लेख असलेले फलक लावावेत. सर्व संस्थांना आता २४ तास लसीकरण करण्यास परवानगी
देण्यात येत आहे. परंतु, आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये
सायंकाळी सहापर्यंत लसीकरण करण्यात येईल. लशींचा उपलब्ध असलेला साठा त्याच दिवशी
संपविणे आवश्यक आहे. येथून पुढे लशीची मागणी करताना १० दिवसांऐवजी आता तीन
दिवसांसाठी करण्याची सूचना करण्यता आली आहे. मागणी केल्यानुसार २४ तासानंतर
दुसऱ्या दिवशी तालुक्यातून एक गाडी जिल्हा लससाठा केंद्राकडे पाठविणे आवश्यक आहे.
या नियमांमुळे लसीकरण प्रक्रिया सुरळीत होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
'क्रॉस' लसीकरण टाळण्याच्या सूचना
लसीकरण केंद्रांवर 'कोव्हिशिल्ड' आणि 'कोव्हॅक्सिन' या दोन्ही लशी दिल्या जात आहेत. मात्र,
नागरिकाला लशीचा दुसरा डोस देण्यापूर्वी, त्याने
पहिला डोस कोणत्या लशीचा घेतला होता, याची खात्री लस
देणाऱ्या कर्मचाऱ्याने करावी आणि 'क्रॉस' लसीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. लसीकरण करताना लशींचे वाया जाण्याचे
प्रमाण शून्य टक्क्यावर आणावे, तसेच वाया गेलेली लस आणि
वापरण्यात आलेली लस याची माहिती संकलित करून, ती वरिष्ठ
अधिकाऱ्यांना पाठविण्याच्या सूचना दिल्याचे आयुष प्रसाद यांनी सांगितले.