डिंभा प्रतिनिधी:
आपल्या देशाचा आर्थिक,
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकास घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना
उपक्रमाची महत्वाची भूमिका दिसून येते. देशातील युवा शक्तीला नवचेतना देण्याचे
कार्य राष्ट्रीय सेवा योजनेतून होत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविताना
तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य
महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. विशेषतः
शिक्षण क्षेत्रातून सेवा संस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी,
युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा या हेतूने सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे,
राष्ट्रीय सेवा योजना व श्री. पंढरीनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोखरी,
ता. आंबेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बेंढारवाडी, पो. पोखरी, ता. आंबेगाव येथे
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर ८ मार्च ते १४ मार्च २०२१ या कालावधीत पार
पडले.
सात दिवसीय
श्रमसंस्कार शिबिरात आदिवासी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रबोधन
व्हावे म्हणून आदिवासी पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी स्वच्छता अभियान,
सुसंस्कृरीत युवक, पेसा व वनहक्क, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आदिवासी व्यक्तिमत्त्व
विकास, युवकांपुढील आव्हाने या विषयांवर नामदेवराव कोळप, सीताराम जोशी
(मा.उपकुलसचिव, पुणे विद्यापीठ), प्रा. चेतन वानखेडे, प्रा. कविता अभंग, अशोक
पेकारी, राजू घोडे यांनी शिबिरार्थी आणि ग्रामस्थांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
शिबिरात बांध दुरुस्ती, मंदिर परिसर साफसफाई, पाईपलाईन वर सिमेंट ढापे बसविणे,
रस्ते साफसफाई आदी कामे करण्यात आली. त्याचप्रमाणे आदिवासी भागातील समाजाचे हक्क,
कर्तव्य, रोजगार याबाबत ग्राम सर्वेक्षण करण्यात आले.
शिबिराचे संयोजन
प्रा. लहू तिटकारे (राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी), प्रा. नम्रता पारधी, विशाल
बेंढारी यांनी केले. डॉ. शशिकांत साळवे (प्राचार्य), बाळासाहेब कोळप (अध्यक्ष,
श्री.पं.वि. वि.मंडळ, पोखरी), किसन दांगट (संचालक), नामदेव दांगट (व.दु. उ.संस्था,
पोखरी), अशोक कोळप (ग्रा.स. पोखरी), दुंदाजी कोळप, मारुती कोळप, तुकाराम तळपे, प्रदीप
कोळप, ज्ञानेश्वर कोळप, बुधाजी कोळप, पुंडलिक बेंढारी यांचे विशेष सहकार्य लाभले.
श्रम शिबिराची सांगता प्रा. भास्कर जगदाळे यांच्या "या जगण्यावर शतदा प्रेम
करावे" या किर्तनपर जनजागृती व्याख्यानाने झाली. सदर दिवशी ग्रामस्थ व
प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे
पालन करण्यात आले.