शिक्रापूर प्रतिनिधी:
शिक्रापूर येथे काही दिवसांपूर्वी
बँकेकडे गहाण ठेवलेल्या जमिनीची परस्पर विक्री केल्याप्रकरणी रुपेंदरकोर हरचरणपाल
नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा व विजय दिनकर धुमाळ यांच्यावर
शिक्रापूर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.
शिक्रापूर येथील जमीन गट नंबर ४६२ मधील जमीन विकत घेण्यासाठी रुपेंदरकोर नंदा यांनी शिवाजीराव भोसले सहकारी बँक वडगाव शेरी बँकेतून ऑक्टोबर २०१० मध्ये एक कोटी चाळीस लाख रुपये तर मोहनसिंग नंदा यांनी सत्तर लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेतल्यानंतर त्यांनी तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचे गहाणखत करून दिले. त्यानंतर त्यांनी कर्जाची रक्कम बँकेला न भरता बँकेचे कर्ज थकविले. २०१५ मध्ये बँकेची फसवणूक करण्याच्या हेतूने पिंपळे धुमाळ येथील एका व्यक्तीला जमीनीची विक्री केली. याबाबत बँकेच्या निदर्शनास सर्व प्रकार आल्यानंतर वसुली अधिकारी विकास राजाराम पवार यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी रुपेंदरकोर हरचरणपाल नंदा, हरचरणपाल मोहनसिंग नंदा (दोघे रा. सुखवाणी आर्केड अशोका म्युझ समोर कोंढवा पुणे) व विजय दिनकर धुमाळ (रा. पिंपळे धुमाळ ता. शिरूर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत.