मंचर ( ता.आंबेगाव ) येथील मुळेवाडी रोडवर असलेले ॲक्सिस बँकेचे एटीएम अज्ञात चोरांनी चोरून नेले असून सुमारे ६,०१०००/- रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत ए.टी.एम चे काम पाहणारे प्रकाश हिरामण पाटील यांनी अज्ञात चोरट्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक २६ रोजी सिक्युअर वॅल्यू कंपनीचे अमोल दिगंबर शिंदे यांनी फोनद्वारे प्रकाश पाटील यांना कळविले की, मंचर मुळेवाडी रोड वरील ॲक्सिस बँकेचे ए.टी.एम. मधून रात्री १:३५ वा. चे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमांनी सदर ए.टी.एम. चे मशीन कशाने तरी उचकटून त्यामधील असलेले कॅश रक्कमेसह उचलून चोरून नेलेले आहे, तुम्ही त्या ठिकाणी जावून आम्हाला माहीती दया असे सांगितले. त्याप्रमाणे पाटील हे लगेच मुळेवाडी रोड मंचर येथील ॲक्सिस बँकेचे ए.टी.एम. जवळ गेले व ए.टी.एम मशीन चेक केले असता समोरील काचेचा दरवाजा पुर्ण तुटलेला दिसला व आतील ए.टी.एम. मशीन उचलून नेलेले होते. तसेच ए टी एम. मशीन असलेल्या ठिकाणचा सी.सी.टी.व्ही कॅमेरा चेक केला असता त्यावर काळे रंगाचा स्प्रे मारलेला दिसला. सदरबाबत खात्री करून पाटील यांनी आमचे ए.जी.एस. कंपनीतील अमोल शिंदे यांना फोनद्वारे माहीती देवून त्यांना सदर ठिकाणचे परिस्थितीचे फोटो पाठविले. त्यानंतर फिर्यादी यास माहीत पडले की, सदर ए टी.एम. मशीन पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ गाडीत टाकून चोरून नेले आहे. त्यानंतर ॲक्सिस बँकेचे स्विच कडून पाटील यांना माहिती मिळाली की, १,००,००० रू. एक विनकोड कंपनीचे ए.टी.एम.मशीन त्याचा आयडी.क. BWCW265304 व ५,०१,०००/- रुपयांच्या चलनी नोटा असे एकूण ६,०१०००/- रू. ऐवज चोरीला गेलेला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाम्भते यांनी घटनास्थळी भेट देऊन मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तपासासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पथके रवाना केली आहेत. याबाबत प्रकाश पाटील यांनी मंचर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करत आहेत.