नारायणगाव प्रतिनिधी
नारायणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी बस स्टँड च्या समोर नाकाबंदी करीत असताना खोडद वरून बस स्टँड च्या दिशेने लॉकडाऊन च्या काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या 'किराणा माल आंबेगाव तालुका' असा बोर्ड असणारी टाटा सुमो गाडी क्रमांक एम. एच. १४ जी. ३७७१ येत होती. पोलिसांनी गाडीच्या ड्रायव्हरला गाडी थांबविण्याचा इशारा केला परंतु ड्रायव्हरने गाडी न थांबविता वेगात मंचर च्या दिशेने निघाला असता पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी ताबडतोब त्या गाडीचा सिने स्टाइलने पाठलाग सुरू केला व मांजरवाडी फाटा येथे गाडी थांबविली. गाडीच्या ड्रायव्हर कडे वाहतूक पास व गाडीमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये विविध खोक्यांमध्ये देशी-विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या दिसून आल्या. सदर गाडी नारायणगाव पोलिस स्टेशनमध्ये आणून पंचा समक्ष पंचनामा केला असता त्यामध्ये रुपये ३६,५३०/- च्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या व रुपये १,००,०००/- किमतीचा किराणामाल होता. तो जप्त करून अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या भरत कुंडलिक पिंगळे व परेश पांडुरंग खुडे (राहणार मंचर, तालुका आंबेगाव ) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
सदर कामगिरी दिपाली खन्ना (उपविभागीय अधिकारी जुन्नर) यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, लोंढे, साबळे, कोबल, लोहार, आरगडे, पोलीस मित्र भरत मुठे यांनी कारवाई केली पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल साबळे करीत आहे.