कोरोना या महाभयंकर आजाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉकडाऊन आणि या लॉकडाऊन मध्ये आंबेगाव तालुक्यात कामानिमित्ताने आलेले पर राज्यातील मजूर आणि इतर लोकांना आपल्या घरी पाठविण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगावच्या तहसिलदार रमा जोशी व शासकीय यंत्रणेची लगबग सुरू झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कामानिमित्ताने किंवा अन्य काही कारणास्तव आलेले परप्रांतीय लोकांना एसटीने आपल्या घरी पाठविण्याची तयारी सुरू झाली आहे. छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणा-या लोकांना एसटी महामंडळाच्या बसने मंचर व घोडेगाव येथुन रवाना केले. आंबेगाव तहसिलदार रमा जोशी, नायब तहसिलदार अनंता गवारी, लतादेवी वाजे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार, पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव, वैदयकिय अधिक्षक डॉ. प्रताप चिंचोलीकर, डॉ. चंदाराणी पाटील, मंडलाधिकारी योगेश पाडळे, सुनिल नंदकर, तलाठी दिपक हरण, संजय गायकवाड, दिपक करडुले, माने आदि अन्य कर्मचारी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश मध्ये जाणाऱ्या जवळपास ५५९ लोकांना एकत्र करून त्यांच्या गावी बसने पाठवून दिले.
सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन
एसटी बसच्या प्रत्येक सीटवर एक असे फक्त बावीस लोक यावेळी प्रवास करत आहे. छत्तीसगडला जाण्यासाठी ६ गाडयांमध्ये १३७ प्रवासी, मध्यप्रदेशला जाण्यासाठी १६ गाडयांमध्ये ४२२ लोकांना रवाना करण्यात आले. तर महाराष्ट्राच्या यवतमाळ, लातूर आदि विविध जिल्हयात जाण्यासाठी ३१२ प्रवाशांना ११ एसटीबसच्या सहायाने त्यांच्या इच्छित स्थळी पोहचविण्यात आले. संबंधित लोकांना रवाना करताना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे, सॅनिटायझर आदि बाबींचा अवलंब करण्यात आला.
सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार रमा जोशी, संपुर्ण तालुका महसुल प्रशासनाने विशेष नियोजन करून अडकुन पडलेल्या कामगार व मजुरांना महाराष्ट्राच्या विविध जिल्हयात व परप्रांतियांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी चांगले नियोजन केले.