देशात एकीकडे कोरणाने डोके वर काढायला सुरुवात केली असतानाच संभाजी भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी गाईच्या तुपाचा आणि गोमूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल,’गोमूत्र आणि गाईचं तूप तीव्र जंतूनाशक आहे. त्यामुळे दर 3 ते 4 तासाने तूप नाकात फिरवले, गोमूत्र दिले तर कोरोनाचे रुग्ण फार लवकर बरे होईल,’अशी अफवा पसरविणा-या संभाजी भिडे विरुद्ध महाराष्ट्र कोव्हिड १९ अधिनियम कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून दंडनिय कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत असल्याने राज्यासह देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराहून अधिक आहे. तर राज्यात दोनशेपेक्षा अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी कोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने या उपायांचा वापर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.कोरोनामुळे मृत पावलेल्या बहुतांश व्यक्ती ६५-७० वयाच्या आहेत. तरुण क्वचितच कोरोनामुळे मृत पावत असल्याचं दिसून आले आहे. त्यामुळे तरुण मुलांना मैदानावर खेळायला सोडावे. सरकारनं लागू केलेल्या लॉक डाऊन (टाळेबंदी) मध्ये शिथिलता आणायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
कोरोनावरील उपचारांत गोमूत्र आणि गायीचे तूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असा दावा देखील त्यांनी केला. गोमूत्र, गायीचे तूप, अतितीव्र जंतूनाशकं आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना केंद्र आणि राज्य शासनाने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे त्यांनी सुचवले. कोरोनाबाधितांच्या खाण्यापिण्यात गोमूत्र, गायीच्या तुपाचा उपयोग केला जावा. त्याने नक्कीच फरक पडेल. कोणतेही जंतू श्वासावाटे आपल्या शरीरात जात असल्याचे मी आयुर्वेदात वाचले आहे. या जंतूंचा नाश करण्याचे सामर्थ्य गायीच्या तुपामध्ये आहे. बाकी कशातही इतकी शक्ती नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या नाकाला दर ३ ते ४ तासांनी तुपाचे बोट लावावे. सकाळ संध्याकाळ त्यांना गोमूत्र प्यायला द्यावे, असे उपाय त्यांनी सुचवले. केंद्र आणि राज्य सरकार भगवंताने दिलेल्या उपायांचा वापर आग्रहपूर्वक करत नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर केला गेल्यास हे संशोधन आपण पुढल्या पिढ्यांना देऊ शकू. त्याचा त्यांना उपयोग होईल. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने गोमूत्र आणि गायीच्या तुपाचा वापर करावा, असे संभाजी भिडे म्हणाले.
देशात साथरोग अधिनियम लागु झाला आहे. महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रसिद्ध करून साथरोग अधिनियम १९८७ नुसार कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी ” महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२०” हा कायदा १४ मार्च २०२० पासून राज्यात लागू केला आहे. सदर अधिनियमातील कलम ६ नुसार कोणत्याही व्यक्तीस, संस्था संघटनाना कोव्हीड १९ बाबत कोणत्याही प्रकारची अफवा, अनधिकृत माहिती इलेक्ट्रॉनिक मिडीया किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यासाठी आयुक्त आरोग्य सेवा व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक आरोग्य सेवा मुंबई, संचालक आरोग्य सेवा पुणे व संचालक वैधकीय शिक्षण व संशोधन मुंबई, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या मार्फतच अधिकृत माहितीच्या प्रसारणाचे नियम घालून देण्यात आले आहे.
कोव्हीड १९ बद्दल कोणतीही अनधिकृत माहिती अथवा अफवा पसरविणा-या व्यक्ती संस्था व संघटना यांच्या विरुद्ध कायदेशीर व दंडात्मक कारवाई प्रस्तावित आहे. त्यामुळे भिडे यांनी केलेली विधाने ही निव्वळ अफवा असून त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही किंवा भिडे ही व्यक्ती अधिनियमातील माहिती प्रसारण करू शकणारी अधिकृत व्यक्ती देखील नाही. देश आणि राज्यात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम लागू झालेला असताना त्यांनी आज सांगलीत पत्रकारांसमक्ष कोरोना पिडीत व्यक्तीच्या जीविताला धोका निर्माण होईल अश्या उपाययोजना सांगून अफवा पसरविली आहे.
त्याकरीता सांगली जिल्हा पोलीस अधिक्षकांनी भादंवि (४५ ऑफ) १८६० चे कलम १८८ नुसार संभाजी भिडे विरुद्ध तात्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी व दंडात्मक कारवाई देखील करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता राजेन्द्र पातोडे यांनी केली आहे.