मंचर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात निर्जंतुकीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. अमरनाथ सेवा संघ तसेच ग्रामपंचायत मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. आज सकाळी या निर्जंतुकीकरण कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा कक्ष ठेवण्यात आला असून पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांच्यासाठी हा कक्ष कायमस्वरूपी सुरू राहणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून या निर्जंतुकीकरण कक्षाचा वापर करावा असे आव्हान सरपंच दत्ता गांजळे यांनी केले आहे.
दरम्यान शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या कक्षाची पाहणी करून काही आवश्यक सूचना दिल्या. अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन, अवधूत शेटे, रामराजे निघोट, शेखर चौधरी, सरपंच दत्ता गांजाळे, भैरवनाथ संस्थेचे संचालक सागर काजळे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन शिंदे, गावकामगार तलाठी हेमंत भागवत आदी यावेळी उपस्थित होते.
या निर्जंतुकीकरण कक्षाचा उपयोग कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी होईल अशी माहिती अमरनाथ सेवा संघाचे अध्यक्ष दिलीप महाजन यांनी दिली. सरपंच गांजाळे म्हणाले; नागरिकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलात तर निर्जंतुकीकरण कक्षात प्रवेश करूनच घरी जावे. घरपोच सेवा देणारे कर्मचारी आणि स्वयंसेवक तसेच पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, बँकेचे कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार या सर्वांनी घरी परतताना निर्जंतुकीकरण कक्षात जाऊन मगच घरी पोहोचावे; असे आव्हान सरपंच दत्ता गांजाळे यांनी केले आहे.
निर्जंतुकीकरण कक्षाची पाहणी करताना शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव.