मंचर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारे दुकानदार तसेच बँका, पतसंस्था यांचे कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतले आहे . ग्रामपंचायतच्या वतीने सर्व व्यक्तीचे तापमान आठवड्यातुन दोन वेळा घेण्याचे काम सरपंच दत्ता गांजाळे यांनी चालू केले आहे.
चाकण येथे अंडी विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने खबरदारी म्हणून मंचर येथे अत्यावश्यक सेवा देणारे मेडिकल, किराणा,भाजीपाला,शिवभोजन,होम डिलीव्हरी करणारे तसेच बॅंका,पतसंस्था यांचे बाहेर गावावरून येणारे कर्मचारी याचे तापमान घेण्यात येत आहे. आज स्वतः सरपंच दत्ता गांजाळे यांनी अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानात जाऊन तसेच बँका, पतसंस्थामध्ये जाऊन तापमान तपासले . प्रत्येक व्यक्तीच्या तापमानाची नोंद ठेवण्यात आली आहे. दर आठवड्याला 2 वेळा तापमान घेऊन जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या तापमानात बद्दल आढळल्यास त्याचे मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून घेण्यात येईल. असे सरपंच गांजाळे यांनी सांगितले.
मंचर येथे असणाऱ्या विविध बॅंका ,पतसंस्था या ठिकाणी असणारे कर्मचारी हे बाहेर गावावरून कामासाठी मंचर येथे येत असतात. खबरदारी म्हणून या सर्व कर्मचाऱ्यांची तापमानाची तपासणी करून ग्रामपंचायत कर्मचारी अतुल लोंढे ,दिलीप थोरात, नरेंद्र निघोट या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या तापमानाच्या नोंदी ठेवून दर आठवड्याला यांची पुन्हा तपासणी होईल. कर्मचाऱ्यांच्या तापमानात फरक आढळल्यास त्यांची दवाखान्यात नेऊन तपासणी करणार आहे . या पूर्वी मंचर येथे सलग चार वेळा दर रविवारी संपूर्ण मंचर शहर पूर्णपणे बंद ठेवले जात होते. ते येथून पुढील काळातही दर रविवारी जनता कर्फ्यु राहणार आहे. मंचर मधील बहुतेक चौकात निर्जंतुकीकरण सेवा उपलब्ध करून दिली आहे. किराणा, भाजीपाला घरपोच सेवा देणे ग्रामपंचायतच्या वतीने चालू आहे. आता आरोग्य तपासणी मोहीम ग्रामपंचायत प्रशासनाने हाती घेतली असून कोरोनाचा एकही रुग्ण शहरात येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.