पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला आहे. कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर आणि कर्मचारी प्रतिनिधी यांनी जुन्नर चे आमदार अतुल बेनके आणि उपविभागीय अधिकारी जितेंद्र दुडी यांच्याकडे सव्वा सात लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याची घटना घडली आहे. अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला हा कारखाना दातृत्वातही अग्रेसर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस, आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि शेतकऱ्यांना मोफत सॅनिटायझर्स देणार असल्याचेही कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी सांगितले आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने आता भारतासह महाराष्ट्रातही डोके वर काढायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य शासनही कसोशीने प्रयत्न करत आहे. राज्य शासनाला हातभार लावण्यासाठी अनेक संस्था, आस्थापना आणि सामाजिक कार्यकर्ते आपल्या परीने समाजाला आणि शासनाला सहकार्य करत आहेत. अनेक उद्योजक, सिने अभिनेते, शासकीय कर्मचारी आदींनी आपापल्या परीने मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले आर्थिक योगदान दिले आहे. परंतु राज्यात पहिल्यांदाच एका सहकारी कारखान्याने कोरोनाला थोपविण्यासाठी अशा प्रकारे मदत केली आहे. त्यामुळे राज्यभर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे.