देशभर सध्या निजामुद्दीन येथील मरकज चा मुद्दा गाजतोय. कोरोना प्रसारासाठी धार्मीक कार्यक्रमांमुळे हातभार लागण्याची शक्यता वारंवार बोलून दाखवूनही हा धार्मीक कार्यक्रम पार पडला आणि त्यामुळे शेकडो लोकांना कोरोनाची लागण झाली असं पुढे येत आहे. देशातील कोरोनाचं संकट आता हलकं वाटू लागेल. इतकी चर्चा या निमित्ताने मुस्लीम धर्मीयांवर होत आहे. राष्ट्रीय माध्यमं आणि काही विशिष्ट पक्षाच्या अनुयायांची वक्तव्ये किंवा सोशल मिडीयावरील पोस्ट या निव्वळ चिथावणीखोर आहेत. या चर्चा ताज्या असतानाच आता कर्नाटकातील आशा ( ASHA ) सेविकेवर ही हल्ला झाल्याची बातमी आलीय. वस्तीत सर्वे आणि तपासणीसाठी गेलेल्या आशा वर्कर वर हल्ला करण्यात आला, धक्काबुक्की करण्यात आली. हे सर्व गंभीर आहे. या सर्व प्रकारांमध्ये मुस्लीम धर्मीयांवर आता टीका केली जात आहे. हे देशासाठी योग्य नाही.
देशभरात कोरोना मुळे लॉकडाऊन असताना; काही मशीदींमध्ये नमाज पढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे व्हिडीयो ही दरम्यानच्या काळात व्हायरल होते. आज तर ट्वीटर वर निजामुद्दीन मधले अतिरेकी #NizamuddinTerrorists #TabligiJamaat ASHA असे मुस्लीमांच्या विरोधातले ट्रेंड सुरू होते. हे सगळं भयानक आहे. देशावर आलेल्या संकटाच्या काळातही देशातील एक मोठा ऑनलाइन समुदाय हिंदू-मुस्लीम अशा भावना भडकवत बसला आहे.
या देशातील मुस्लीम हा मुख्य प्रवाहापासून फारकत घेऊन वागतो, तो राष्ट्रवादी नाही, त्याच्या निष्ठा पाकिस्तानाशी आहेत, भारतापेक्षा त्यांना इतर मुस्लीम राष्ट्रे महत्वाची वाटतात. अशा प्रकारचा प्रचार काही नवीन नाही. देशातील सामान्य मुस्लीमांना सतत आपल्या राष्ट्रप्रेमाचे पुरावे ही द्यायला भाग पाडलं जातं. काही विकाऊ मुल्ला मौलवी स्टुडीयोत बसवून हिंदू-मुस्लीम असा खेळ केला जातो. याबाबत मी या आधीही लिहिलेलं आहे. इतकी गरळ ओकणारे मुस्लीम धर्मगुरू मी स्टुडीयोच्या बाहेर अभावानेच पाहिलेले आहेत. काही कट्टर मुस्लीम धर्मगुरू अशी भाषा बोलतात. असाच कट्टरपणा हिंदू धर्मातील काही पक्ष ही बोलतात. दोन्ही कडे तितकाच कट्टरपणा आहे. त्याचं समर्थन कुठल्याही शहाण्या भारतीयाने करूच नये.
कट्टरता ही माणसाला अमानवीय बनवते. सध्या सोशल मिडीयावर ही कट्टरता दिसून येत आहे. या कट्टरते साठी एका विशिष्ट राजकीय पक्षाला मी दोष देईन. तितकाच देश मी या देशातील मुस्लीम समुदायाला ही देईल. कट्टरता पसरवणाऱ्या धर्मांध मुस्लीम धर्मगुरूंचा निषेध खुल्या स्वरात देशातील मुस्लीमांनी करून सुधारणांची कास पकडली पाहिजे. हा देश तुमचा आहे. हे वारंवार सिद्ध करायला लावणाऱ्यांच्या विरोधात जसं इथला सुजाण-देशप्रेमी सामान्य नागरिक सातत्याने मुस्लीम समुदायाच्या मागे उभा राहतो. आता मुस्लीम समुदायातील सुजाण नागरिकांची ही जबाबदारी आहे, त्यांनी आपल्याबद्दलचे गैरसमज पसरवणाऱ्या तत्त्वांना थारा देता कामा नये.
मुस्लीम समुदायामध्ये सुधारणांचा वेग कमी आहे. तो आता वाढवला पाहिजे. मुस्लीम समुदायाची बाजू मांडतील अशी माध्यमं ही कमी आहेत. त्यांच्या पर्यंत समतोल विचार पोहोचवतील अशा माध्यमांची आता गरज आहे. योग्य माहिती, ज्ञान यांचा प्रसार यामुळे ही या समुदायाबाबतचे आणि समुदायात असलेले गैरसमज दूर होण्यास मदत होईल. राष्ट्रीय प्रसारमाध्यमं सुपारी घेतल्यासारखं देशातील एकूणच सर्व मुस्लीमांना दोषी ठरवून मोकळी होत असतात. ही माध्यमे पक्षपाती वागतात. यातूनच आधी पक्षीय असलेली द्वेषाची भावना सार्वत्रिक होऊ लागते.
मुस्लीम समुदायातील तरूणांची आता ही जबाबदारी आहे, स्वतःची माध्यमं सुरू करा. आपली बाजू मांडा. तुमची लढाई तुम्हाला लढायचीय. सुधारणांची कास पकडा. स्वतःच्या धर्माचं पालन करत असताना कट्टरतावादाचं आचरण करू नका. ट्रॅप मध्ये अडकू नका. चुकीचं वागणाऱ्यांच्या मागे केवळ धर्मासाठी उभं राहू नका. या देशाचा मुख्य प्रवाह हा अजून ही या देशातील दलित-शोषित जनतेला सोबत घ्यायला तयार नाही.
कोरोना संकटामुळे या देशातील वर्गवाद ही पुन्हा एकदा समोर आला आहे. अशा परिस्थितीत तुमचं मुख्य प्रवाहात सामील होणं लांबच आहे. हा कथित मुख्य प्रवाह करप्ट आहे. याकडे पाहू नका. देशाची राज्यघटना हाच या देशाचा मुख्यप्रवाह आहे. त्यात सामील होणं सर्व नागरिकांचं कर्तव्य आहे. राज्यघटनेचा आधार घ्या. नाहीतर कुठल्याही संकटाच्या काळात सतत तुमचा धर्म शोधून तुमच्यावर आघात केले जातील. स्वतःचं अपयश दडवण्याचं ते एक बेस्ट साधन ही आहे. त्यामुळे चूक करू नका. असं मत मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केले आहे