मंचर पोलीस ठाण्याच्या हवालदाराचा उर्मठपणा, गरीब निरागस मुलांना अमानुष मारहाण
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द या ठिकानी आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जात असणाऱ्या ओंकार ससाणे आणि त्याचा अल्पवयीन भाऊ रोहन ससाणे या दोघांना मंचर पोलीस स्टेशनचे अवसरी बिट चे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी काहीही विचारपूस न करता अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला असून; आंबेगाव तालुक्यातून या घटनेचा प्रचंड निषेध व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केल्यानंतर नागरिकांनीही घरातच राहणे पसंद केले असून काही अपवाद वगळता या लॉकडाऊनला चांगला प्रतिसादही मिळत आहे. सुरवातीच्या काळात पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना चोप दिल्याची उदाहरणे समोर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी पोलिसांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला खरा, मात्र पोलीसी अहंकार आणि माज डोक्यात गेलेल्या काही अधिकाऱ्यांची अक्कल अद्याप ठिकाणावर आल्याचे दिसत नाही.
अशाच पोलिसी अहंकारातून मंचर पोलीस ठाण्याचे अवसरी बीटचे पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी 'आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या निरागस भावंडाना कुठलीही विचारपूस न करता मारहाण केली आहे. या भावंडांपैकी ओंकार ससाणे याने आपण डबा घेऊन जात असल्याचे संगीतल्यावरही पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी 'जेवणाचा डबा घेऊन जातो तर माझ्यावर उपकार करतो काय?' असा उर्मठ सवाल देखील केला. ओंकार ससानेला मारहाण करून झाल्यानंतर शिंदे यांनी ओंकार चा लहान आणि अल्पवयीन भाऊ रोहन ससाणे यालाही मारहाण केली. असं करण्यापुर्वी ओंकार ने वारंवार शिंदे यांना आपला भाऊ अल्पवयीन आहे असे सांगूनही हवालदार शिंदेंनी त्याचे काहीही ऐकले नाही.
या गरीब आणि निरागस मुलांना मारहाण करण्यापूर्वी या उर्मठ हवालदाराने एकदा तरी मुलांची विचारपूस करणे गरजेचे होते अशी चर्चा संतप्त नागरिक करत आहेत. जेव्हा ही मुले आपल्या आई वडिलांना डबा घेऊन जात होते, तेव्हा हे हवालदार महाशय रस्त्याच्या बाजूला काही ओळखीच्या नागरिकांशी गप्पा मारत बसले होते. सर्वसामान्य, मजबूर आणि गरीब माणसाला पोलीस आपला रुबाब दाखवतात, परंतु मोठ्यांपुढे लोटांगण घेतात हेच या घटनेतून समोर आले आहे.