अवसरी येथील रहिवाशी असणाऱ्या ससाणे भावंडांना अमानुष मारहाण करणाऱ्या हवालदाराला निलंबित करण्यात यावे अशी मागणी युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे विस्तारक सचिन बांगर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे केली आहे.
दिनांक ३ एप्रिल रोजी शेतावर काम करत असणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ओंकार ससाणे आणि रोहन ससाणे या भावंडांना गावडेवाडीच्या हद्दीत मंचर पोलीस ठाण्याचे अवसरी बीट चे हवालदार सुनील शिंदे यांनी अमानुष मारहाण केली होती. यात ओंकार ससानेच्या डोक्यात काठी लागून त्याची शुद्ध देखील हरपली होती.
या मारहाणीचा व्हिडीओ राज्यभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली होती, त्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ संबंधित हवालदाराची पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुणे येथील मुख्यालयात बदली केली होती.
ससाणे भावंडाना झालेल्या या मारहाणीचा प्रकार अतिशय निंदनीय असून यात ओंकार च्या डोक्यावर झालेला आघात अजून थोडा जरी तीव्र असता तर त्याच्या जीवाला काही बरे वाईट होण्याची शक्यता निर्माण झाली असती, त्यामुळे अशा बेजाबदर आणि निष्ठुर अधिकाऱ्याची बदली करून चालणार नाहीत तर त्याचे निलंबन करण्यात यावे अशी आग्रहाची मागणी सचिन बांगर यांनी केली असून त्यांच्या मागणीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील मिळत आहे.
या संदर्भात सचिन बांगर यांनी शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचे मार्गदर्शन घेऊन सदर मागणी केली असून ते सातत्याने संबंधितांकडून आढावा घेत आहेत.
ससाणे भावंडांना अशी झाली होती मारहाण, व्हिडिओच्या शेवटी ओंकार चक्कर येऊन पडताना दिसत आहे. यात बराच वेळ ओंकार ची शुद्ध देखील हरपली होती.