देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लाईट बंद करुन दिवे लावण्याच्या आवाहनला रविवारी रात्री मोठा प्रतिसाद मिळाला. पण ९ मिनिटे लाईट बंद करुन ठेवण्यामुळे राज्यात वीज ग्रीडवर परिणाम होऊन वीजेचा पुरवठा खंडीत होण्याची भीती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली होती. परंतू वीज ग्रीडवर या लाईट बंद करण्याच्या प्रक्रियेचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही.
त्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्या, ऊर्जा विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग्य नियोजन केल्याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच जनतेनेही घरातील मेन स्वीच बंद न करता केवळ विजेचे दिवे बंद करुन मेणबत्त्या व इतर दिवे लावल्याने ऊर्जामंत्र्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत. दिवे बंद करण्याच्या उपक्रमाच्या काही मिनिटे आधापीसून ऊर्जामंत्री नागपूरच्या नियंत्रण कक्षातून संपूर्ण राज्यभरातील वीज अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ९ मिनिटांच्या कालावधीत राज्यभरात विनाव्यत्यय वीज पुरवठा सुरू होता. या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
त्या ९ मिनिटांत कसा झाला विजेचा वापर? वेळ विजेची मागणी (मेगावॅट)
रात्री ८. ३९ १३ हजार ३७७
रात्री ८. ४२ १३ हजार १२१
रात्री ८.५४ १२ हजार ८५७
रात्री ८.५७ १२ हजार ४५५
रात्री ९.०० ११ हजार ३१५
रात्री ९.०३ १० हजार ३६५
रात्री ९.०५ १० हजार १२१
रात्री ९.०७ ९ हजार ९७३
रात्री ९.०९ ९ हजार ८८०
रात्री ९.१२ १० हजार ७४१
या ९ मिनिटांत विजेच्या मागणीत सुमारे ३ हजार २४१ मेगावॅटची घसरण झाली. या दरम्यान फ्रिक्वेन्सी कमाल ५०. २३ ते किमान ५०.०९ नोंदवण्यात आली. या दरम्यानच्या काळात कोयना जलविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र तसेच औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये चंद्रपूर, कोराडी आणि पारस विद्युत केंद्रातून वीज उत्पादन सुरू होते. ९ मिनिटांच्या कालावधीत लोकांनी स्वेच्छेने लाईट बंद केले पण मेन स्विच बंद न करत ऊर्जा विभागाला सहकार्य केले म्हणून ऊर्जामंत्री राऊत यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.