ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान,कळंब(ता.आंबेगाव) च्या वतीने कोरोना आपत्तीमुळे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साधेपणाने साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा फुले-आंबेडकरांच्या जयंती निमित्ताने सार्वजनिक मिरवणुका, शोभायात्रा काढू नयेत, वाद्ये वाजवू नयेत, त्याऐवजी घरामध्येच या थोर महात्म्यांच्या प्रतिमेला अभिवादन करावे, असे आवाहन शासनाद्वारे करण्यात आले होते.त्याचे पालन करत ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या मनीषा कानडे ,समीक्षा कानडे ,सम्राट कानडे ,शांता कानडे यांनी प्रतिमापूजन केले .एक दिवा ज्ञानाचा ...तर एक दिवा संविधानाचा लावत या महापुरुषांचे जीवनाधारीत गाण्यांचे श्रवण केले.निवडक पुस्तकांचे वाचन केले.कु.सान्वी कानडे ,लावण्या कानडे ,ईश्वरी कानडे यांनी ..आला भीमराया,जग उद्धाराया ..हे गीत गाऊन जयजयकार करत महामानवाला अभिवादन केले.
यावेळी बाळासाहेब कानडे म्हणाले, "थोर समाज सुधारक महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाचा प्रकाश दाखवला.समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली.समाज प्रबोधनात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.मानव तितुका एकच आहे .त्यांची समतेची,शिक्षणाची ,सामाजिक सलोख्याची शिकवण डोळ्यासमोर ठेवूनच आपण आचरण करूया ." फुले-आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून कोरोनाविषयक खबरदारी घेत परिसरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना खाऊवाटप करण्यात आले ,चार गरजू कुटुंबाना आठ्वड्याभरासाठी किराणा देण्यात आला असून पंतप्रधान/मुख्यमंत्री मदतनिधीसाठीही खारीचा वाटा देणार असल्याचे बाळासाहेब कानडे यांनी सांगितले.
कळंब (ता.आंबेगाव) येथे ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले