दिनांक ३ एप्रिल २०२० रोजी संध्याकाळी आंबेगाव तालुक्यातील अवसरी येथील वायाळ मळा येथील शेतावर काम करणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या दोन भावंडांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलीस हवालदार सुनील शिंदे यांची पुणे येथे पुणे ग्रामीण पोलीस च्या मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. सर्वप्रथम समर्थ भारत न्यूज ने घटनेची दखल घेत या पोलीस हवालदाराचे कारनामे जनतेसमोर आणले होते. या बातमीची दखल घेत; अधीक्षक संदीप पाटील याांनी ही कारवाई केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने निष्पाप, निरागस भावंडे, त्यांचे कुटुंबीय आणि जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना ला आळा घालण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू असून यादरम्यान पोटापाण्यासाठी घराबाहेर निघणाऱ्या जनतेशी सबुरीने घेण्याचा सल्ला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देऊनही काही पोलीस अधिकारी या सुचनेकडे दुर्लक्ष करत गरीब जनतेवर रुबाब करत आहेत. पोलीस हवालदार शिंदे यांनी देखील शेतावर राबणाऱ्या आपल्या आई वडिलांना जेवण घेऊन जाणाऱ्या गरीब, दुर्बल आणि निरागस भावंडांना अमानुषपणे मारहाण केली होती. या दोघांपैकी रोहन ससाणे हा तर अल्पवयीन होता, हे माहिती असूनही शिंदेंनी त्यालाही सोडले नव्हते.
वायाळ मळ्याकडे जात असताना गावडेवाडी येथे दोघा भावंडांना झालेल्या या मारहाणीत पोलीस हवालदार शिंदे यांची मुजोरी आम्ही सर्वप्रथम जनतेसमोर आणली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची कल्पनाही दिली. मंचर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांनी दिलेले आश्वासन पाळले देखील. यानिमित्ताने पोलीस प्रशासन आपल्या अधिकाऱ्यांच्या चुकीला पाठीशी घालत नाही; हे दाखवून दिले.
निष्ठुर पोलीस हवालदार सुनील शिंदे यांनी अशी केली होती मारहाण.